लोक जागर
शहरभर लावलेल्या ‘स्वच्छ पुणे, सुंदर पुणे’ या पाटय़ांना काळे फासण्याचे काम सध्या जोरात सुरू आहे. कुणालाही न विचारता, सुरू असलेली ही मनमानी कोणासाठी आहे आणि त्याचा नेमका कुणाला फायदा होणार आहे, याबद्दल जराही डोके न चालवण्याची पुणे महानगरपालिकेची परंपरा आत्ताही तशीच सुरू आहे. साधा प्रश्न आहे. संभाजी उद्यानात निवांतपणे बसण्याची मोठी सोय असताना, त्याच उद्यानाच्या दारातील जंगली महाराज रस्त्यावर बाकडी टाकून गप्पा मारण्याची सोय करणे, याला मूर्खपणा म्हणावे, की शहाणपणा? असलेला रूंद रस्ता दुहेरी वाहतुकीला अपुरा पडू लागला, म्हणून एकेरी करण्यात आला. आता तोच अरूंद करण्यात येतो आहे. त्याला पालिकेच्या अतिशहाण्या अधिकाऱ्यांचे उत्तर असे, की एकेरी केल्यानंतर दोन्ही बाजूला वाहने लावून उरलेली जागा होती, तेवढाच रस्ता आताही राहणार आहे. त्यामुळे अरुंदीकरण होणार, या आरोपात तथ्य नाही. आता या रस्त्यावर वाहने लावण्याची सोय राहणार नाही. संभाजी उद्यानाच्या दारात असलेल्या आणि डेक्कन बसस्थानकाजवळ असलेल्या वाहनतळातच वाहने लावावीत, असे पालिकेचे म्हणणे आहे. ही व्यवस्था पुरेशी आहे, असेही या साऱ्या आंधळेपणाने कारभार करणाऱ्यांना वाटते आहे.
शहराचे सौंदर्य वाढवण्यासाठी असलेल्या सोयी काढून टाकणे हे उत्तर असू शकत नाही. या रस्त्यावर पार्किंगसाठी जादा पैसे मोजावे लागले, तरच नागरिक वाहनतळात वाहने लावतील. पण इथे तर पार्किंग फुकट करण्याचा बावळट हट्ट सुरू आहे. संभाजी उद्यानाच्या आत असलेल्या उद्यान विभागातील कर्मचाऱ्यांची वाहनेही उद्यानाच्या वाहनतळाऐवजी कार्यालयाच्या दारात उभी केली जातात. चालणाऱ्यांना त्याचा अडथळा होतो. पण या कर्मचाऱ्यांना चार पावले चालण्याचाही त्रास होतो, तर मग रस्त्यावर वाहने न लावण्याची शिक्षा किती मोठी असेल? बरे, काहीच महिन्यांपूर्वी या रस्त्याच्या निदान एका बाजूला पदपथ रूंद करण्याचे काम झाले. एवढे मोठे पदपथ हीपण चैन म्हणावी अशी. पण पालिकेच्या सुपीक डोक्यात आणखी मोठे पदपथ करण्याची कल्पना घोंघावू लागली. औंधमधील एका रस्त्यावर असे सुशोभीकरण करायचे होते, पण तेथे विरोध झाला म्हणून ऐन निवडणुकीच्या धामधुमीत जंगली महाराज रस्त्याचे सुशोभीकरण करून आपली हौस भागवून घेण्याचे ठरले.
शहरातील एकही पदपथ अतिक्रमणमुक्त नाही, अशी आजची स्थिती आहे. ते काम प्राधान्याने करायचे सोडून एखाद्या रस्त्याचे पदपथ वाढून तिथे अधिक सोयी देणे हा तद्दन मूर्खपणा झाला. पदपथांवर वाहने लावली जातात, बहुतेक ठिकाणी वाहनांची गॅरेज सुखेनैव सुरू असतात. टपऱ्यांसाठी तर पदपथ ही हक्काची जागा असते. पण एकतरी पदपथ चालण्यायोग्य आहे का, याचा शोध पालिकेने का घेऊ नये? त्यावर घातलेल्या टाईल्स चालणाऱ्यांना किती त्रासदायक असतात, याची पाहणी तरी कधी केली आहे का? कितीतरी ठिकाणी या टाईल्स वेगवेगळ्या आकाराच्या, रंगांच्या आणि उंचसखल आहेत. बहुतेक पदपथांवरील या टाईल्स उखडल्या गेल्या आहेत. सुविधा आणि सौंदर्य हातात हात घालून जाणे अशक्य नाही. पण सुविधा वगळून सौंदर्य वाढवण्याचा प्रयत्न करण्याने अडचणी अधिक वाढणार आहेत. पालिकेच्या आयुक्तांना शहरातील उद्योगपतींकडून सामाजिक ‘उत्तरदायित्व’च्या नावाखाली अधिक पैसे मिळवण्यासाठीच वेळ अपुरा पडत असल्याने, जंगली महाराज रस्त्यावर चालण्यास वेळ कोठून मिळणार?
शहर अधिक असुंदर कसे होईल, याकडे अधिक लक्ष देणे यालाच कार्यक्षमता म्हणतात, असा जर आयुक्तांचा समज असेल, तर त्यासाठी त्यांना सिंहगड रस्त्यावर नव्याने उभारलेल्या उंचच उंच लोखंडी खांबांची पाहणी करावी लागेल. असला गलिच्छपणा करून आपला गाढवपणा सार्वजनिक करण्यापेक्षा पालिकेने शहराचे सौंदर्य वाढवण्यासाठी चित्रकार, वास्तुशिल्पी, शहर नियोजनकार यांचा सल्ला घ्यावा. आपल्याला सगळ्याच गोष्टींमधले कळते, असा गैरसमज करून घेऊन सारे शहर अस्वच्छ आणि असुंदर करण्याचा अधिकार या आयुक्तांना दिला तरी कोणी?
नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांना तरी हे सारे कळते आहे का, हा प्रश्नच आहे..
mukund.sangoram@expressindian.com