पुणे : रेल्वे प्रवासादरम्यान गाडीत बसून पावसाचा अनुभव अनेक प्रवाशांना येऊ लागला आहे. अनेक गाड्यांमध्ये पावसाचे पाणी गळत असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून केल्या जात आहेत. याचबरोबर गाड्यांमध्ये अस्वच्छता असून, झुरळे झाल्याच्या तक्रारीही होत आहेत. आधीच गाड्यांना होणारा विलंब दिवसेंदिवस वाढत असताना आता प्रवाशांना प्रवासातही त्रास होऊ लागला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही दिवसांपूर्वी वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये पावसाचे पाणी गळत असल्याचे प्रकार समोर आले होते. आता इतरही गाड्यांमध्ये असा प्रकार होऊ लागला आहे. प्रवासादरम्यान पावसाचे पाणी रेल्वे गाडीच्या वातानुकूलित श्रेणीच्या डब्यात येत असल्याची तक्रार पार्थ शर्मा नावाच्या प्रवाशाने समाजमाध्यमावर केली आहे. त्याने याचा व्हिडीओही ट्वीट केला आहे. गाडीत पाणी गळत असून, चादरी अस्वच्छ आहेत. स्वच्छतागृहांबद्दल तर न बोललेले बरे. मी आता काय रेनकोट घालून रेल्वे प्रवास करायचा का, अशी तक्रार या प्रवाशाने केली आहे. यावर पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापिका इंदू दुबे यांनी ही तक्रार संबंधित विभागाकडे पाठविण्यात आल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा – गरिबीचा शाप! अंत्यविधीसाठी पैसे नसल्याने पोटच्या पोरीस घरीच पूरले

पुणे-कन्याकुमारी एक्स्प्रेसमध्ये झुरळे फिरत असल्याचा व्हिडीओ अब्दुल रौफ या प्रवाशाने ट्वीट केला आहे. गाडीत सगळीकडे झुरळे झाल्याचे त्यात दिसत आहे. त्याने म्हटले आहे, की गाडीत झुरळे असल्याची बाब मी तिकीट तपासणीसाच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर त्याने गाडीत पँट्री असल्याने झुरळे झाल्याचे सांगितले. त्याने कोणतीही उपाययोजना न करता हात झटकण्याची भूमिका घेतली.

या तक्रारीवर विभागीय रेल्वे व्यवस्थापिका इंदू दुबे यांनी दिलगिरी व्यक्त केली. त्यांनी यात वरिष्ठ विभागीय अभियांत्रिकी अभियंत्यांना लक्ष घालण्यास सांगितले आहे. रेल्वेगाड्यांना होणारा विलंब दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. आता रेल्वे प्रवासादरम्यानही प्रवाशांचे हाल होण्याचे प्रकार समोर येत आहेत. रेल्वेने प्रवाशांना चांगल्या दर्जाची सेवा द्यावी, अशी अपेक्षा प्रवासी व्यक्त करीत आहेत.

हेही वाचा – राज्यात मान्सून पुन्हा जोर धरण्याची शक्यता, विदर्भात आज मुसळधार

रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गाड्यांमध्ये पावसाचे पाणी गळणे आणि अस्वच्छता यावर तातडीने उपाय करायला हवेत. विभागीय रेल्वे सल्लागार समितीची बैठक लवकरच होणार असून, अधिकाऱ्यांसमोर हे मुद्दे मांडणार आहे. – निखिल काची, सदस्य, विभागीय रेल्वे सल्लागार समिती

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dirty trains cockroaches due to which train passengers are disturbed pune print news stj 05 ssb
Show comments