लोकसत्ता वार्ताहर
बारामती : जागृती अपंग विश्वस्त संस्था यांच्या वतीने दीपक विश्वनाथ गायकवाड यांनी उपविभागीय अधिकारी बारामती येथील कार्यालयात निवेदन सादर केले आहे, या निवेदनामध्ये बारामतीच्या तहसील कार्यालयाकडून अपंग बांधवांना अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याची तक्रार व्यक्त करण्यात आली आहे.
बारामती शहरातील दिव्यांग संस्था चालविणारे दीपक गायकवाड यांनी निवेदनात असे नमूद केले आहे की, दिव्यांगाना दिल्या जाणाऱ्या संजय गांधी निराधार योजनेतील निधीत दिव्यांगांच्या मुलाची अट नसताना देखील त्यांची प्रकरणे नाकारली जात आहेत, बारामती तहसील कार्यालय येथील कर्मचारी हे दिवंग्यांना नाहक त्रास देऊन अपमानास्पद वागणूक देत आहेत, दिव्यांगाचा अपमान करून त्यांचा तिरस्कार पण केला जात आहे,
सद्यस्थितीमध्ये दिव्यांगांना कोणीही सांभाळत नाही, ते कुटुंबावर बोज बनलेले असताना अपंगाच्या अशा व्यक्तींवर अन्याय होतो आहे, खरंतर शासनाने दिव्यांग व्यक्तींना दरमहा दहा हजार रुपये मानधन देणे आवश्यक आहे, दिव्यांगांच्या मानधनातील वाढीच्या मागणी साठी वेळोवेळी पत्र व्यवहार ही करण्यात आलेला आहे, दिव्यांगांची मुलं सज्ञान झाल्यावर दिवंग्यांचे मानधन बंद करण्यात येत आहे, या प्रकरणाबाबत निवेदन दिले असता बारामती येथील तहसील कार्यालयामध्ये निवेदन स्वीकारले जात नाहीत, निवेदन दिले असता त्याची पोच सुद्धा दिली जात नाही.
साधारण दोन-तीन महिने हे निवेदनाच्या प्रति या तलाठी कार्यालयामध्ये पडून राहतात, यावर मात्र कोणतीही कारवाई केली जात नाही, आणि असे निवेदनाच्या प्रती नंतर कालांतराने गहाळ होतात, या कारणामुळे दिव्यांग व्यक्तींना पुन्हा पुन्हा तहसील कार्यालयामध्ये निवेदन सादर करावे लागते, यामुळे दिवंगांना नाहक खर्च पण सहन करावा लागतो, याबाबत योग्य ती कारवाई करण्यात यावी,अशी विनंती जागृती अपंग विश्वस्त संस्था यांच्या वतीने दीपक गायकवाड यांनी केली आहे.
या निवेदनाच्या प्रती दीपक गायकवाड यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तसेच अपंग आयुक्त आणि जिल्हाधिकारी पुणे व बारामती विभागाचे उपविभागीय अधिकारी यांना पाठविण्यात आले आहेत. या निवेदनावर जागृती अपंग विश्वस्त संस्था अध्यक्ष दीपक गायकवाड आणि उपाध्यक्ष अजिज शेख यांच्या सह्या आहेत.