संभाव्य आपत्तीच्या घटना हाताळण्यासाठी पिंपरी पालिकेने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला असल्याचे महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले. औद्योगिक परिसरातील रसायन गळती आदी आपत्कालीन घटना घडल्यास, तसेच रासायनिक हल्ल्यासारखी गंभीर परिस्थिती उद्भवल्यास शहरातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज असली पाहिजे, अशी अपेक्षाही सिंह यांनी व्यक्त केली.
हेही वाचा >>>पिंपरी : सहशहर अभियंत्यांना नव्या जबाबदाऱ्यांचे वाटप
राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे कमांडंट संतोष सिंह यांनी शेखर सिंह यांची पालिका मुख्यालयात भेट घेतली. महापालिकेची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम होण्यासाठी; तसेच आपत्कालीन परिस्थितीत एनडीआरएफ समवेत समन्वयाच्या दृष्टीने या भेटीत चर्चा झाली. डेप्युटी कमांडंट दीपक तिवारी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल या वेळी आदी उपस्थित होते.
हेही वाचा >>>पुणे : कौटुंबिक वादातून अल्पवयीन विवाहित युवतीचा खून , लोहगावमधील घटना ; पतीला अटक
आयुक्त शेखर सिंह म्हणाले, पावसाळ्यात नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होऊन पूर परिस्थिती निर्माण होते. औद्योगिक परिसरात वायू गळती, रासायनिक आग अशा घटना घडतात. अशा वेळी आपत्कालीन परिस्थितीत काही वेळा एनडीआरएफला पाचारण करावे लागते. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जात असताना शहरातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम असणे गरजेचे आहे. आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित सर्व यंत्रणांमध्ये योग्य समन्वय असला पाहिजे.