पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या परिसरात सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे धरणांमधून नदीपात्रात सुरू असलेला पाण्याचा विसर्ग पूर्णपणे थांबविण्यात आला आहे. केवळ खडकवासला धरणातून मुठा उजवा कालव्यात, तर पानशेत धरणामधून वीजनिर्मितीसाठी पाणी सोडण्यात येत आहे, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. चारही धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत. चारही धरणांत मिळून एकूण २९.१० अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच ९९.८३ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. परिणामी या चारही धरणांमधून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतल्याने चारही धरणांमधून नदीत सुरू असलेला पाण्याचा विसर्ग थांबविण्यात आला आहे. वरसगाव आणि पानशेत धरणांमधून नदीत किंवा वीजनिर्मितीसाठी पाणी सोडण्याचे बंद करण्यात आले आहे. तर, सध्या केवळ खडकवासला धरणातून मुठा उजवा कालव्यात १००५ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. तसेच पानशेत धरणामधून ६५० क्युसेकने वीजनिर्मितीसाठी पाणी सोडण्यात येत आहे, असेही जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड व परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण १०० टक्के भरले आहे. या धरणातून १४४२ क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. जिल्ह्यातील इतर धरणांपैकी पिंपळगाव जोगे, येडगाव, घोड, कळमोडी, चासकमान, वडीवळे, आंद्रा, निरा देवघर, भाटघर, वीर, नाझरे आणि उजनी ही धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. त्यामुळे या धरणांमधून कमी-अधिक प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे, असेही जलसंपदा विभागाने सांगितले.

प्रमुख धरणांमधील पाणीसाठा टीएमसी, कंसात टक्क्यांत

टेमघर ३.६६ (९८.६४), वरसगाव १२.८२ (१००) पानशेत १०.६५ (१००), खडकवासला १.९७ (१००), भामा आसखेड ७.३७ (९६.१४), पवना ८.५१ (१००), डिंभे १२.०९ (९६.८१), चासकमान ७.५७ (१००), गुंजवणी ३.६२ (९८.१६), निरा देवघर ११.७३ (१००), भाटघर २३.५० (१००), वीर ९.४१ (१००) आणि उजनी ५३.५७ (१००)

Story img Loader