खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणे यंदा पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत. खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातून यंदा मुठा नदीत आतापर्यंत २३.०५ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी सोडून देण्यात आले आहे. शहराला दरमहा सव्वा ते दीड टीएमसी पाण्याची गरज असते. त्यानुसार शहराला तब्बल दीड वर्ष पुरेल एवढे पाणी आतापर्यंत सोडून देण्यात आले आहे.
हेही वाचा >>>भीमाशंकर निघालेल्या भाविकांच्या बसला आग ; बसचालकाच्या तत्परतेमुळे भाविक बचावले
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमध्ये सध्या २९.०८ टीएमसी म्हणजेच ९९.७७ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. यंदा मोसमी पाऊस सक्रिय झाल्यापासून संपूर्ण जून महिन्यात पावसाने पाठ फिरवली. तसेच यंदा पूर्वमोसमी पावसानेही धरणांच्या परिसरात हजेरी लावली नाही. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांनी तळ गाठला होता. या पार्श्वभूमीवर पुणे शहरात पाणीकपात करण्याची वेळ आली आणि ४ जुलैपासून पाणीकपातीच्या निर्णयाची अंमलबजावणी देखील सुरू करण्यात आली. मात्र, त्यानंतर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला. परिणामी खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत. त्यामुळे पुढील पावसाळ्यापर्यंत शहर आणि जिल्ह्याला अनुक्रमे पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाण्याची चिंता मिटली आहे.
हेही वाचा >>>पुणे : मुख्य सचिवांचे लेखी आदेश ; पीक विमा, अतिवृष्टीची मदत मिळण्याचा मार्ग मोकळा ; ‘लोकसत्ता’च्या वृत्ताची दखल
दरम्यान, यंदा हंगामात १२ जुलै रोजी खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने या धरणातून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. त्यानंतर पानशेत धरण ११ ऑगस्ट, तर वरसगाव हे धरण १३ ऑगस्ट रोजी १०० टक्के भरले. त्यामुळे या तिन्ही धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. सध्या परतीचा पाऊस सुरू असला, तरी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात तुरळक पाऊस हजेरी लावत आहे. परिणामी धरणांमधून पाण्याचा विसर्ग तूर्त बंद आहे. आतापर्यंत २३.०५ टीएमसी पाणी नदीत सोडण्यात आले आहे. शहराला दरमहा सव्वा ते दीड टीएमसी पाण्याची गरज असते. त्यानुसार शहराला दीड वर्ष पुरेल एवढ्या पाण्याचा विसर्ग नदीत करण्यात आल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.
गेल्या पाच वर्षातील महत्तम पाण्याचा विसर्ग
वर्ष दिनांक विसर्ग (क्युसेक वेगाने)
२०१८ १६ जुलै १८,४९१
२०१९ ४ ऑगस्ट ४५,४७४
हेही वाचा >>>पुणे : म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचे आमिष ; ज्येष्ठ महिलेची १५ लाखांची फसवणूक
२०२० १३ ऑगस्ट १६,२४७
२०२१ २२ जुलै २५,०३६
२०२२ १६ सप्टेंबर ३०,६७७