पुणे : शहरातील वाहतुकीची बेशिस्त दिवसेंदिवस वाढत आहे. त्याला आळा घालण्यासाठी वारंवार नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांचा परवाना निलंबित करण्याचे पाऊल उचलले जाते. यंदा दरमहा सरासरी शंभर वाहनचालकांचे परवाना ३ ते ६ महिन्यांपर्यंत निलंबित करण्यात आले आहेत. वाहतूक पोलिसांच्या प्रस्तावानुसार प्रादेशिक परिवहन कार्यालयाने ही कारवाई केली आहे.
वाहतुकीच्या नियमांचा वारंवार भंग करणाऱ्या वाहनचालकांची यादी वाहतूक पोलिसांकडून आरटीओला पाठविली जाते. या वाहनचालकांचा परवाना निलंबित करावा, अशी शिफारसही करण्यात येते. पोलिसांनी पाठविलेल्या प्रस्तावावर आरटीओकडून दर महिन्याच्या अखेरीस कारवाई केली जाते. त्यात पोलिसांनी दिलेल्या गुन्ह्यानुसार वाहनचालकांचा परवाना तीन ते सहा महिन्यांपर्यंत निलंबित केला जातो.
आणखी वाचा-आरोग्य अधिकाऱ्यांच्या दिमतीला नवीन मोटारी अन् खर्च फक्त ३ कोटी ८६ लाख रुपये
जानेवारी ते जून या कालावधीत आरटीओकडून ६१८ वाहनचालकांचे परवाना निलंबित करण्यात आले. त्यात मद्यप्राशन करून वाहन चालविणे, अतिवेगाने वाहन चालविणे, सिग्नल तोडणे, हेल्मेट न परिधान करणे, वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे, क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक या नियमभंगाच्या प्रकाराचा समावेश आहे. आरटीओकडून परवाना निलंबित करण्यात आल्याची माहिती संबंधित वाहनचालकाला ऑनलाइन दिली जाते. परवाना निलंबनाच्या कालावधीत चालक वाहन चालविताना आढळल्यास त्याच्यावर पाच हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करून त्यांचे वाहनही जप्त केले जाऊ शकते.
आणखी वाचा-गणेशोत्सवात १८०० ‘सीसीटीव्ही’ कॅमऱ्यांची पुण्यावर नजर
परवाना निलंबित होण्याचे प्रमाण
- सिग्नल तोडणे : २३७
- वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे : १७५
- अतिवेगाने वाहन चालविणे : ४५
- हेल्मेट न वापरणे : २७
- मद्यप्राशन करून वाहन चालविणे : २०
- क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी व मालवाहतूक : ५
- सीटबेल्ट न वापरणे : १
- इतर नियमभंग : १०८
परवाना निलंबनाचा कालावधी
- ३ महिने : अतिवेगाने वाहन चालविणे, सिग्नल तोडणे, हेल्मेट न परिधान करणे, वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे, क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक, ट्रिपल सीट
- ६ महिने : मद्यप्राशन करून वाहन चालविणे
परवाना निलंबनाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर वाहनचालकांना पुन्हा वाहन चालविता येते. यात केवळ मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या चालकांचा अपवाद आहे. त्यांना वाहनाची तंदुरुस्ती तपासणी आणि वाहन चालविण्याची चाचणी पुन्हा द्यावी लागते. त्यानंतर त्यांना पुन्हा परवाना मिळतो. -संजीव भोर, प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी
वाहतूक नियमांचा वारंवार भंग करणाऱ्या वाहनचालकांचा परवाना निलंबित करण्याची शिफारस वाहतूक पोलिसांकडून आरटीओकडे केली जाते. आमच्याकडून दर आठवड्याला अशा वाहनचालकांची यादी पाठविण्यात येते. दरमहा सुमारे शंभर ते दीडशे जणांची नावे पाठविली जातात. -विजयकुमार मगर, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा