शिस्तबद्ध पक्ष अशी प्रतिमा असलेले आणि किमान ३० वर्षांत प्रत्येक विधानसभा आणि महापालिका निवडणुकीमध्ये अधिक यश मिळणारा पुण्यातील एकमेव पक्ष म्हणजे भाजप. पुण्यात आजपर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये पाच खासदार आणि १४ आमदार दिलेल्या या पक्षाच्या शिस्तीला आता बाधा आली आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत निवडून आलेल्या ९७ पैकी निम्म्याहून अधिक नगरसेवक हे ऐन वेळी अन्य पक्षांतून भाजपमध्ये आले. त्यांच्या संगतीत गेल्या पाच वर्षांत राहिल्यानंतर संघाच्या मुशीतून तयार झालेल्या या पक्षाला असंगाशी संग केल्याने आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये बंडखोरीची लागण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागात पारंपरिक मतदार असलेल्या भाजपने गेल्या ३० वर्षांत पुण्यात चांगलेच यश मिळविले. महापालिका निवडणुकीबरोबरच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्येही भाजपने मुसंडी मारलेली दिसते. पुण्याच्या मध्यवर्ती भागात ताकत असलेल्या या पक्षाने प्रत्येक निवडणुकीत हळूहळू पाय पसरलेले दिसतात. पक्षाची शिस्त आणि एकनिष्ठ कार्यकर्ते यामुळे या पक्षाची पाळेमुळे दिवसेंदिवस भक्कम झालेली दिसतात. मात्र, आता या पक्षालाही काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षांप्रमाणे बेशिस्तीची लागण लागण्याची चिन्हे आहेत.
आणखी वाचा-राज्य सरकारचेच अधिकारी, कर्मचारी हक्काच्या वेतनापासून वंचित… प्रकरण काय?
मागील लोकसभा, विधानसभा आणि पुणे महापालिकेच्या निवडणुकांवर नजर टाकल्यास भाजपची ताकत वाढलेली दिसते. पुण्यात १९९१ पासून या पक्षाला लोकसभा निवडणुकीमध्ये यश मिळू लागले. अण्णा जोशी हे भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले पहिले खासदार झाल्यानंतर पुढील दोन निवडणुकांमध्ये भाजपला अपयश आले. तेव्हा सुरेश कलमाडी यांचे पुण्यावर प्राबल्य होते. त्यानंतर १९९९ मध्ये प्रदीप रावत विजयी झाले. पुढील निवडणुकीत पुन्हा कलमाडी हे निवडून आले.
मात्र, २०१४ नंतर सलग तीन वेळा पुण्यावर भाजपचे वर्चस्व राहिले आहे. २०१४ मध्ये अनिल शिरोळे आणि २०१९ मध्ये गिरीश बापट आणि नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मुरलीधर मोहोळ विजयी झाले. त्यामुळे लोकसभेला भाजपची सतत विजयाची चढती कमान राहिली आहे.
लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणुकीमध्येही भाजपला पुणेकर साथ देत आले आहेत. बापट हे कसबा मतदारसंघातून पाच वेळा, अण्णा जोशी आणि मुक्ता टिळक प्रत्येकी एकदा निवडून आल्या. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून अण्णा जोशी दोन वेळा, विजय काळे आणि विद्यामान आमदार सिद्धार्थ शिरोळे हे आमदार झाले आहेत.
आणखी वाचा-PLC Sanitation Monitor Project: सरकारने पैसे थकवल्याचा आरोप करत उपोषण… मंत्र्यांचे म्हणणे काय?
कोथरूडमधून मेधा कुलकर्णी आणि चंद्रकांत पाटील प्रत्येकी एकदा, पर्वतीतून दिलीप कांबळे आणि विश्वास गांगुर्डे प्रत्येकी एकदा, तर माधुरी मिसाळ यांनी सलग तीन वेळा प्रतिनिधित्व केले आहे. पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून दिलीप कांबळे आणि त्यांचे बंधू सुनील कांबळे हे प्रत्येकी एकदा निवडून आले आहेत. वडगाव शेरीमधून जगदीश मुळीक, खडकवासलातून भीमराव तापकीर हे आमदार निवडून आले आहेत. हडपसरमध्ये योगेश टिळेकर यांनी यापूर्वी प्रतिनिधित्व केले आहे.
पुणे महापालिकेत तर भाजप कायम पारंपरिक भागावरील पकड घट्ट ठेवून आहे. १९९२ च्या महापालिका निवडणुकीत भाजपचे २४ नगरसेवक होते. त्यानंतर झालेल्या १९९७ च्या निवडणुकीत भाजपला थोडा फटका बसला होता. तेव्हा पुण्यात काँग्रेसची चलती होती. त्या निवडणुकीत भाजपचे २० नगरसेवक होते. नंतर २००२ पासून ते २०१२ पर्यंत झालेल्या तीन महापालिका निवडणुकांमध्ये भाजपने आपापल्या बालेकिल्ल्यांना धक्का लावू दिला नाही. त्यामुळे २००७ मध्ये २५ आणि २०१२ मध्ये २६ नगरसेवक निवडून आले. २०१७ मध्ये भाजपने बेरजेचे राजकारण केले. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अन्य पक्षांतील नगरसेवकांना भाजपमध्ये घेऊन निवडणूक लढविली. त्यामुळे पहिल्यांदाच ९७ नगरसेवक निवडून आणून भाजपने एकहाती सत्ता काबीज केली. बहुतांश नगरसेवक हे आयात केलेले होते. मागील पाच वर्षांत त्यांच्या साथीत भाजपने कारभार पाहिला. आता आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीप्रमाणे भाजपमध्येही बंडखोरीची शक्यता निर्माण झाली आहे. त्याची सुरुवात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीला कोथरुडमध्ये भाजपच्याच माजी नगरसेवकांकडून दिलेल्या आव्हानाने झाली आहे. हे बंडखोरीचे आव्हान थोपविण्याची वेळ भाजपवर आली आहे.
sujit.tambade@expressindia.com