पिंपरी : चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप यांच्याऐवजी त्यांचे दीर, भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांची उमेदवारी निश्चित झाल्याची चर्चा होत आहे. मात्र, त्यावरून भाजपमध्ये अस्वस्थता असून, बुधवारी भाजपच्या १५ माजी नगरसेवकांनी बैठक घेऊन आक्रमक भूमिका घेतली. ‘जगताप कुटुंबात उमेदवारी देण्याऐवजी आमच्यापैकी कोणा एकाला उमेदवारी द्यावी,’ अशी मागणी या १५ माजी नगरसेवकांच्या गटाने केली आहे. त्याच वेळी, जगतापसमर्थक माजी नगरसेवकांनी एकत्र येऊन उमेदवाराच्या पाठीशी राहणार असल्याचे जाहीर केल्याने चिंचवड विधानसभा मतदारसंघावरून पिंपरी-चिंंचवड भाजपमध्ये गटबाजी उफाळून आल्याचे दिसत आहे.
हेही वाचा >>> पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील इच्छुकांवर फुली? श्रीनाथ भिमाले, दिलीप कांबळे यांची मंडळावर वर्णी
चिंचवड विधानसभा मतदारसंघातून लक्ष्मण जगताप एकदा अपक्ष आणि दोन वेळा भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. जानेवारी २०२३ मध्ये त्यांचे निधन झाल्याने पोटनिवडणूक झाली. पोटनिवडणुकीत त्यांची पत्नी अश्विनी जगताप निवडून आल्या. या पोटनिवडणुकीतील उमेदवारीवरून आमदार अश्विनी जगताप आणि दीर शंकर यांच्यातील संघर्षाने गृहकलह चव्हाट्यावर आला होता. उमेदवारी न देता, शंकर जगताप यांच्याकडे भाजपच्या शहराध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली. मात्र, त्यांंची शहराध्यक्षपदी निवड झाल्याने नाराज झालेल्या माजी नगरसेवकांच्या गटाने असहकाराची भूमिका घेतली. हा गट कधीच त्यांच्यासोबत दिसला नाही. या गटाने आमदार अश्विनी जगताप यांना साथ देऊन दीड वर्ष काम केले. परंतु, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जगताप कुटुंबातील दीर-भावजयीमध्ये समेट झाल्याचे सांगितले जाते. त्यातच उमेदवारी ठरविण्यासाठी भाजपने राबविलेल्या सर्वेक्षणात उमेदवारीसाठी शंकर जगताप यांना पहिली, तर अश्विनी जगताप यांना दुसरी पसंती असल्याचे समोर आले. या पार्श्वभूमीवर, अश्विनी जगताप यांनी माघार घेतल्याची चर्चा असून, शंकर जगताप यांची उमेदवारी निश्चित असल्याचे सांगितले जाते. मात्र, त्यामुळे आता त्यांच्यावर नाराज असलेल्यांचा गट आक्रमक झाला आहे.
हेही वाचा >>> इंदापूरनंतर महायुतीला दौंडमध्ये धक्का, माजी आमदार रमेश थोरात शरद पवारांच्या भेटीला
या गटाने तातडीने बैठक घेतली. ‘आमदारकी, शहराध्यक्षपद जगताप कुटुंबात, आता पुन्हा जगताप कुटुंबात उमेदवारी कशासाठी? शंकर जगताप हे केवळ एकदा नगरसेवक झाले आहेत. पक्षाला कुटुंब, व्यक्ती नव्हे, तर जनता साथ देत असते. केवळ दिवंगत आमदाराचा भाऊ म्हणून उमेदवारी देणे याेग्य नाही,’ अशी भूमिका घेऊन या माजी नगरसेवकांनी शंकर जगताप यांच्या उमेदवारीला तीव्र विराेध केला आहे. ‘आमच्यापैकी काेणाही एकाला उमेदवारी द्यावी, आम्ही पक्षाचा आमदार निवडून आणू,’ असा दावाही त्यांनी केला. दरम्यान, शंकर जगताप यांचे समर्थक असलेले २५ माजी नगरसेवकही बुधवारी एकत्र आले. त्यांनी शंकर जगताप यांची भेट घेऊन त्यांच्या पाठीशी राहण्याची ग्वाही दिली. परिणामी, चिंचवडच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये फूट पडली असून, पक्षश्रेष्ठींच्या निर्णायाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या माजी नगरसेवकांचा विरोध
जगताप कुटुंबात उमेदवारी देण्यास आठ माजी नगरसेवकांनी उघड विरोध केला आहे. त्यामध्ये चंद्रकांत नखाते, शत्रुघ्न काटे, संदीप कस्पटे, सुनीता तापकीर, माधुरी कुलकर्णी, सविता नखाते, सिद्धेश्वर बारणे, कैलास बारणे यांचा समावेश आहे. पाच माजी नगरसेवकांनी उघडपणे विरोध केला नसून, या गटाच्या भूमिकेला फक्त पाठिंबा दिला आहे. माजी नगरसेवकांबरोबर युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राज तापकीर, शहर उपाध्यक्ष राम वाकडकर हेदेखील या गटाच्या सोबत आहेत.
जगताप कुटुंबाला किती वेळा संधी द्यायची?
त्यांना सोडून उमेदवारी द्यावी. याबाबत चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वेळ मागितली आहे. पक्षाने आमच्या मागणीची दखल न घेतल्यास एकत्र बसून निर्णय घेतला जाईल, असे भाजपचे माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते यांनी सांगितले.