पुणे : माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या शिवसेनेतील पक्ष प्रवेशावरून भारतीय जनता पक्षामध्ये नाराजी पसरली आहे. भाजप नेत्यांकडून त्याबाबत जाहीर विधाने केली जात आहेत. ‘धंगेकर यांच्याविरोधात केवळ पंगा नाही. त्यांना दोनवेळा पराभूत करण्यात आले आहे. त्यांना भाजपमध्ये घेण्याचा विचार कोणी केला असता तर, मी त्यांच्याविरोधात भांडलो असतो,’ अशा शब्दात राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री, कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी धंगेकर यांच्या प्रवेशाबाबत भाष्य केले.

काँग्रेसची साथ सोडत कसब्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी महायुतीतील घटकपक्ष असलेल्या शिवसेनेत (शिंदे) प्रवेश केला होता. धंगेकर महायुतीमध्ये आले असले तरी, कसब्याचे भाजपचे स्थानिक पदाधिकारी आणि धंगेकर यांच्यातील सुप्त संघर्ष कायम राहिली, अशी चर्चा आहे. त्यातच भाजपच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही धंगेकर यांच्या पक्ष प्रवेशावरून समाजमाध्यमातून उघड विरोधी भूमिका घेतली होती. त्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही त्याबाबत भाष्य केले आहे.

‘धंगेकर आणि आमचा केवळ पंगा नाही. आम्ही एकमेकांच्या विरोधात तीन निवडणुका लढविल्या आहेत. त्यातील एक आम्ही हरलो आहे. तर, दोन वेळा आम्ही त्यांना पराभूत केले आहे. राजकारण आणि समाजकारणात अनेक गोष्टी काळाच्या ओघात बदलत असतात. तशी मानसिक तयारी भाजपकडून नेहमीच केली जाते. राज्यात महायुतीचे सरकार आहे. मात्र, धंगेकर यांना भाजपमध्ये घेण्याचा कोणी विचार केला असता, तर मी त्यांच्याविरोधात भांडलो असतो. कोणला पक्षात घ्यायचे, हाचा अधिकार महायुतीमधील प्रत्येक पक्षाला आहे. शहरातील संघटना वाढविण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी त्यांना पक्षात घेतले असेल. त्यामुळे भाजपमधील काही जण त्यांच्या भावना व्यक्त करत आहेत. तसे स्वातंत्र भाजप नेहमीच पदाधिकाऱ्यांना देत असतो. धंगेकर आता महायुतीचे सदस्य झाल्याने वाद होऊ न देण्याचा प्रयत्न केला जाईल,’ असे पाटील यांनी सांगितले.