गटबाजीमुळे पुरती वाट लागलेल्या पिंपरी शहर काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसात घडलेल्या ‘महिलानाटय़ा’मुळे पक्षातील बेदिली पुन्हा चव्हाटय़ावर आली आहे. महिला शहराध्यक्ष नियुक्तीच्या अदला-बदलीचा अक्षरश: पोरखेळ झाला. या घडामोडीत काँग्रेसचे ‘गल्ली ते दिल्ली’ राजकारण ढवळून निघाले. तापलेल्या या वातावरणात शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्या ‘सहस्त्र’भोजन कार्यक्रमाने सर्वाच्याच भुवया उंचावल्या.
काँग्रेसचे संपर्कमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थक अॅड. पद्मिनी मोहिते यांच्यावर निष्क्रियतेचा ठपका ठेवून महिला आघाडीच्या  शहराध्यक्षपदावरून त्यांची उचलबांगडी करण्यात आली. त्या जागी भोईर समर्थक माजी नगरसेविका ज्योती भारती यांची प्रदेशाध्यक्षा कमल व्यवहारे यांच्यामार्फत वर्णी लागली. अवघ्या १५ दिवसात भारतींचे पद काढून घेत भोईर विरोधक नीता परदेशींना ते देण्यात आले. पालिका निवडणुकीत त्यांचे  तिकीट कापण्यात आले होते, त्यात महिला शहराध्यक्षपदावरून डावलण्यात आल्याने त्या तीव्र नाराज होत्या. पूर्ण ताकद लावून श्रेष्ठींचा आशीर्वाद मिळवत त्यांनी दिल्लीतून स्वत:ची वर्णी लावून घेतली. प्रदेशाध्यक्षांनी भारतींची, तर राष्ट्रीय अध्यक्षा अनिता वर्मा यांनी परदेशींची नियुक्ती केल्याने पुरता गोंधळ उडाला. परदेशींच्या नियुक्तीच्या निषेधार्थ भोईर समर्थकांनी राजीनामा देण्याचा इशारा दिला, तेव्हा नेतेही हादरले. त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्षांनी जाहीर केलेली परदेशींची नियुक्ती रद्द करून ज्योती भारतींना कायम ठेवण्यात आले.
या घडामोडींनी वातावरण तापलेले असताना भोईरांनी रावेतच्या ‘भोंडवे लॉन्स’ला सहस्त्रभोजनाचे आयोजन केले. नगरसेवक, प्रमुख कार्यकर्ते, प्रभागातील नागरिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर असे सर्वानाच निमंत्रण होते. जेवणावळीला ‘आखाड पार्टी’ चे स्वरूप येऊ नये म्हणून बिर्याणी व मटन-भाकरी बरोबरच चपाती, भाजी, गुलाबजाम असा शाकाहारी मेनूही ठेवण्यात आला. जोडून कविसंमलेन ठेवले. अनेकांनी हजेरी लावली तसेच दांडीही मारली. हजाराहून अधिक नागरिकांनी आस्वाद घेतला. मात्र, अचानक हे स्नेहभोजन कशासाठी, निवडणुकीच्या तयारीसाठी की अन्य वेगळ्या कारणासाठी, याविषयी पक्षवर्तुळात तर्क आहेत.

Story img Loader