पुणे : उत्तर पश्चिम घाटातील पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वर येथे बेडकाच्या नव्या प्रदेशनिष्ठ प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे. नव्याने शोधलेल्या प्रजातीचा समावेश ‘मीनर्वारीया’ या कुळात करण्यात आला असून, या प्रजातीचे नामकरण ‘मीनर्वारीया घाटीबोरियालिस’ असे करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयातील डॉ. ओमकार यादव, दहिवडी महाविद्यालयातील डॉ. अमृत भोसले, डॉ. प्रियंका पाटील; ठाकरे वाइल्डलाइफ फाउंडेशनचे संशोधक अक्षय खांडेकर आणि भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्थेतील डॉ. के. पी. दिनेश यांचा सहभाग आहे. या संशोधनाचा शोधनिबंध ‘झूटॅक्सा’ या आंतरराष्ट्रीय संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झाला आहे. तेजस ठाकरे यांनी या संशोधनात सहकार्य केले.

मीनर्वारीया कुळातील बेडूक पोटावरील समांतर रेघांमुळे इतर बेडकांपेक्षा वेगळे ठरतात. हे बेडूक साचलेल्या पाण्याशेजारी किंवा छोट्या झऱ्यांजवळ बसून रातकिड्यांसारखा आवाज काढत असल्याने त्यांना ‘क्रिकेट फ्रॉग’ म्हणून ओळखले जाते. नव्याने शोध लागलेल्या प्रजातीचे बेडूक महाबळेश्वरमधील कोळी आळीमधील एका खासगी वाहनतळामध्ये साचलेल्या पाण्याच्या शेजारी आढळून आले. आकाराने ५.५ सेंटिमीटरपेक्षा मोठे असणाऱ्या या प्रजातीचा प्रजनन काळ हा पावसाळ्याच्या सुरुवातीच्या दिवसांपुरता मर्यादित आहे. मोठा आकार, आवाजामधील वेगळेपण आणि वैशिष्ट्यपूर्ण जनुकीय संचावरून ही प्रजाती कुळातील इतर प्रजातींपासून वेगळी ठरते. निशाचर असलेल्या या प्रजातीचे छोटे किडे हे मुख्य खाद्य आहे.

डॉ. यादव म्हणाले, ‘या प्रजातीची शरीरवैशिष्ट्ये भारतात सापडणाऱ्या कुळातील अन्य प्रजातींपेक्षा वेगळी आहेत. या बेडकाचा प्रजनन काळ पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काही दिवसांपुरताच मर्यादित असल्यामुळे ही प्रजाती आतापर्यंत संशोधकांच्या निदर्शनास आली नसावी. या प्रजातीच्या नरांचा प्रजनन काळातील आवाज या कुळातील इतर प्रजातींच्या ज्ञात आवाजापेक्षा अतिशय वेगळा आहे. या वेगळ्या आवाजामुळेच या बेडकांकडे लक्ष वेधले गेले. डॉ. वरद गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील अभ्यास करण्यात आला. या शोधामुळे केवळ प्रजातीमध्ये आणखी एक भर पडणार असे नाही, तर पश्चिम घाटातील जैवविविधतेच्या संरक्षणासाठी आणखी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे अधोरेखित होत आहे.

पश्चिम घाट जैवविविधतेच्या दृष्टीने किती मौल्यवान आहे, हे समोर येत आहे. महाबळेश्वरसारखे पर्यटनस्थळ असलेल्या ठिकाणी प्रदेशनिष्ठ बेडकाच्या प्रजातीचा शोध लागणे हे त्या प्रदेशातील नैसर्गिक अधिवासाच्या संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करणारे आहे, असे डॉ. के. पी. दिनेश यांनी सांगितले.