पुणे : पश्चिम घाटातील जैवविविधतेने संपन्न असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळनजीक बेडकाच्या नव्या प्रजातीचा शोध लागला आहे. बेडकाची शारीर रचना आणि जनुकीय अभ्यासातून ही प्रजाती वेगळी असल्याचे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झाले असून, ‘फ्रायनोडर्मा कोंकणी’ असे या प्रजातीचे नामकरण करण्यात आले आहे.

सातारा येथील आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयातील डॉ. ओमकार यादव, कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयातील डॉ. योगेश कोळी, दहिवडी महाविद्यालयातील डॉ. अमृत भोसले, त्रिवेंद्रम येथील युनिव्हर्सिटी कॉलेजचे डॉ. सुजित गोपालन, माय वे जर्नी ऑर्गनायझेशन संस्थेचे गुरुनाथ कदम, ठाकरे वाइल्डलाइफ फाउंडेशनचे अक्षय खांडेकर, झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे डॉ. के. पी. दिनेश यांचा या संशोधनात सहभाग होता. संशोधनाचा शोधनिबंध जर्नल ऑफ एशिया–पॅसिफिक बायोडायव्हर्सिटी या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झाला आहे.

हेही वाचा – कोथरुडमधील गुंडाकडून तीन लाखांचा गांजा जप्त, लोणी काळभोर भागात कारवाई

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाणथळ जागांच्या सर्वेक्षणादरम्यान बेडकाची नवी प्रजाती आढळून आली. २०२१ मध्ये ठाकूरवाडी गावातील तलावात ही प्रजाती दिसून आली होती. या नवीन प्रजातीच्या शरीराचा आकार, डोक्याची रुंदी, पोटाकडील बाजूला असलेले त्वचीय प्रक्षेपण आणि पाठीवरील विशिष्ट रचनेमुळे ही प्रजाती वेगळी असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर मायटोकॉण्ड्रियल १६ एस आरएनए जनुक आणि न्युक्लीअर टायरोसिनेज जनुकावर आधारित अभ्यासातून ही प्रजाती वेगळी असल्याचे सिद्ध झाले. ही प्रजाती कोकण भागातून शोधण्यात आली असल्यामुळे या प्रजातीचे नामकरण ‘फ्रायनोडर्मा कोंकणी’ असे करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सडे, पाणथळ जागा हा या प्रजातीचा अधिवास आहे. कुडाळ, मालवण तालुक्यातील परुळे, चिपी सडा, धामापूर गावातील कातळसड्यांवरील अधिवासासहित ही प्रजाती बाव-बांबुळी तलाव, धामापूर तलाव, मांडकुली, पाठ तलाव, वालावल तलाव या ठिकाणी आढळून आली.

कोकण किनारपट्टीवरील सड्यांचा सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे. या भागाचा अभ्यास झाल्यास आणखी काही नव्या गोष्टींचा शोध लागू शकतो. हवामानबदल आणि वेगाने होणारे शहरीकरण यामुळे होणाऱ्या पर्यावरणीय बदलांचा परिणामही बेडकांच्या एकूण जीवनावर होत आहे. त्या दृष्टीने पाणथळ जागा, कातळ सडे यांचे संवर्धन गरजेचे आहे, असे संशोधक डॉ. ओमकार यादव यांनी नमूद केले.

हेही वाचा – लोकजागर : पादचारी एक दिवसाचा राजा, अन्य दिवसांचे काय?

तलावातील बेडकांच्या प्रजाती अतिशय दुर्मीळ असल्याने, वरवर पाहता त्या भारतीय बैल बेडकांच्या पिलांसारख्या दिसत असल्याने त्यांची ओळख निश्चित करणे फार कठीण आहे. या प्रजातींच्या दुर्मिळतेचा विचार करून, तसेच ही प्रजाती कोकणात आढळल्याने या नव्या प्रजातीला कोकणचे नाव देण्यात आले. उभयचर प्रजाती नामशेष होण्याच्या काळात प्रजातींच्या दीर्घकालीन संरक्षणासाठी स्थानिक नावांवरून नवीन प्रजातींना नाव देणे महत्त्वाचे आहे, असे झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे शास्त्रज्ञ डॉ. के. पी. दिनेश यांनी सांगितले.

फ्रायनोडर्मा वंशातील पाचवी प्रजाती

भारत आणि बांगलादेश या दोन देशांमध्ये फ्रायनोडर्मा या वंशाचे बेडूक आढळतात. आतापर्यंत या वंशातील चार प्रजातींची नोंद आहे. मात्र, आता नव्या प्रजातीच्या शोधामुळे त्या पाच प्रजाती झाल्या आहेत, असे शास्त्रज्ञांनी सांगितले.

Story img Loader