पुणे : पुणे जिल्ह्यात प्रथमच दुर्मीळ युरेशियन पाणमांजराचा (ऑटर) शोध लागला. इंदापूरमध्ये एका खोल विहिरीमध्ये पडल्याची माहिती मिळताच पुणे वन विभाग आणि रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यातर्फे रेस्क्यू ऑपरेशन राबवून या पाणमांजराची सुटका करण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंदापूरमध्ये एका विहिरीत दुर्मीळ युरेशियन पाणमांजर (ऑटर) सापडले. एका खोल विहिरीमध्ये उदमांजर पडले असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. वन्यप्राण्याच्या मदतीसाठी रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टचे बचावपथक तिथे गेले असता, त्यांना अनपेक्षितरित्या विहिरीत युरोशियन पाणमांजर पडल्याचे दिसले. पुणे जिल्ह्यात या प्राण्याची पहिल्यांदाच नोंद झाल्याचा दावा, वन विभागाने केला आहे.

हेही वाचा – पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले

पाणमांजराची विहिरीतून सुखरूप सुटका करण्यात आली असून सध्या त्याला वन बावधन येथील रेस्क्यू वैद्यकीय उपचार केंद्रामध्ये ठेवण्यात आले आहे. स्थानिकांकडून वन विभागाला शनिवारी विहिरीत उदमांजर पडले असल्याची माहिती मिळाली होती. बचाव पथकाने त्याला पकडण्यासाठी ऑटो ट्रॅप पिंजरा पाण्यात सोडला. सहा तासाच्या प्रतीक्षेनंतर पाणमांजर स्वतःहून पिंजऱ्यात आले. त्याला सुखरूप बाहेर काढल्यानंतर त्याला वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णवाहिकेद्वारे मध्यरात्री पुण्यातील केंद्रात आणण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यातील युरेशियन ऑटरची ही पहिलीच नोंद आहे. अनेक वर्षांपूर्वी स्मूथ कोटेड ऑटर आढळल्याच्या ऐतिहिसिक नोंदी आहेत, मात्र, युरेशियन ऑटरची इतिहासात कोणतीही नोंद नाही, अशी माहिती, पुणे (प्रादेशिक) चे उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांनी दिली. विहिरीत सापडलेले युरेशियन ऑटर कोठून आले, त्याचा इंदापूर परिसरात कोठे अधिवास आहे का, या भागात इतरत्र त्याचे कुटुंब आहे, याचा शोध घेण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी आणि रेस्क्यूचे पथक नेमले आहे. अधिक माहिती मिळाल्यास त्यांच्या संवर्धनाच्या दृष्टीने उपाययोजना राबविण्यास सोपे होईल, असे मोहिते यांनी सांगितले.

स्थानिक वनरक्षक मिलिंद शिंदे, अनंत हुकिरे, शुभम कडू आणि शुभम धायतोंडे आणि रेस्क्यू सीटी टीमचे सदस्य नचिकेत अवधानी, प्रशांत कौलकर, डॉ. श्रीकांत देशमुख यांनी बचाव मोहीम यशस्वी राबविली.

भारतात पाणमांजराच्या तीन प्रजाती आढळतात, त्यापैकी युरेशियन ऑटर ही एक दुर्मीळ प्रजाती आहे. हे पाणमांजर प्रामुख्याने युरोप आणि आशियाच्या काही भागात आढळत असले तरी भारतात त्याचे अस्तित्व दुर्मीळ आहे. हिमालयाच्या पायथ्याशी, ईशान्य भारताचा काही भाग आणि पश्चिम घाटात ते विखुरलेले दिसते. स्वच्छ, गोड्या पाण्यातील अधिवासामध्ये ते राहतात आणि मासे हे प्रमुख खाद्य आहे. पाणमांजरे एकटे राहतात आणि रात्री सक्रीय असतात, असे रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापक-अध्यक्ष नेहा पंचमिया यांनी सांगितले.

हेही वाचा – लसूण महागला, परराज्यातील लसणाची आवक कमी

ताब्यात घेतलेले पाणमांजर नर असून प्रौढ आहे. उपचार केंद्रामध्ये त्याला नैसर्गिक अधिवासात वावरत असल्याप्रमाणे सुरक्षित वाटावे, यासाठी आम्ही पिंजऱ्याची रचना केली आहे. आम्ही कॅमेऱ्याद्वारे त्याच्याकडे पूर्णवेळ लक्ष ठेवत आहोत. आणल्यानंतर ते सक्रिय होते, त्याने खाद्यही संपवले. त्याला कोणत्याही प्रकाराची दुखापत झालेली नाही. आरोग्य तपासणी झाल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल. – नेहा पंचमिया, संस्थापक-अध्यक्ष, रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Discovery of eurasian water cat in pune district rescue of a water cat that fell into a well in indapur pune print news vvk 10 ssb