शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डाॅ. अमोल कोल्हे येत्या काही दिवसांत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात सुरू झाली आहे. पुस्तक दिनानिमित्त डाॅ. अमोल कोल्हे यांनी समाज माध्यमातून प्रसारित केलेल्या छायाचित्रमुळे ही चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.
खासदार अमोल कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज असल्याचे गेल्या काही दिवसांपासून बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमातही ते अलीकडे फारसे दिसत नाहीत. ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने होत आहे. मात्र डाॅ. अमोल कोल्हे यांनी या अफवा असल्याचे वेळोवेळी स्पष्ट केले आहे. मात्र पुस्तक दिनानिमित्त त्यांनी समाजमाध्यमातून दिलेल्या प्रतिक्रियेवरून ते भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.
अमोल कोल्हे यांनी जागतिक पुस्तक दिनानिमित्त दोन छायाचित्र समाजमाध्यमातून प्रसारित केली आहेत. पहिल्या छायाचित्रात त्यांच्या हातात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भाषण संग्रहाचे ‘नेमकेची बोलणे’ हे पुस्तक आहे. तर दुसऱ्या छायाचित्रत ‘द न्यू बीजेपी’ नावाचे पुस्तक दिसत आहे. त्यामुळे कोल्हे यांच्या प्रवेशाबाबत राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे यांनी काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट घेतली होती.