पुणे : फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या ‘पुणे पुस्तक महोत्सवा’त साधना प्रकाशनच्या राजन हर्षे लिखित ‘पक्षी उन्हाचा : सात विद्यापीठांच्या आवारात’ या पुस्तकावर गुरुवारी (२१ डिसेंबर) होणाऱ्या चर्चेचा कार्यक्रम रद्द करावा लागत आहे, असे राष्ट्रीय पुस्तक न्यासाकडून (एनबीटी) कडून ऐनवेळी सांगण्यात आले.   या  निर्णयाचा निषेध करून हा कार्यक्रम आता शुक्रवारी (२२ डिसेंबर) महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात सकाळी साडेदहा वाजता करण्याचे साधना प्रकाशनाने ठरवले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

  या महोत्सवात पुस्तक आणि लेखक यांच्याशी संबंधित कार्यक्रम आयोजित करायचा असल्यास प्रस्ताव द्यावा , असे पत्र एनबीटीने ५ डिसेंबर रोजी अन्य अनेक प्रकाशकांसह साधना प्रकाशनलाही पाठवले होते.  त्यानुसार ८ डिसेंबर रोजी साधना प्रकाशनने, राजन हर्षे लिखित  “पक्षी उन्हाचा” या नव्या पुस्तकावरील चर्चेचा प्रस्ताव पाठवला होता. त्या प्रस्तावाला उत्तर देताना , या संदर्भात आमच्या प्रतिनिधी आकांक्षा बिष्णोई यांच्या संपर्कात राहावे , असे कळविण्यात आले होते. त्यानंतर १२ डिसेंबर रोजी, फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतिगृहावर साधनाचे संपादक विनोद शिरसाठ यांनी आकांक्षा आणि त्यांच्या सहकारी निहारिका यांची भेट घेतली होती. तेव्हा सुहास पाटील, गोपाळ नेवे आणि साईनाथ जाधव हे साधनाचे तीन सहकारीही उपस्थित होते.

हेही वाचा >>> शेकडो कोटींचा निविदा घोळ! आरोग्य विभागाने रद्द केलेली निविदा वैद्यकीय शिक्षणकडून मान्य

त्या भेटीतच आकांक्षा आणि निहारिका यांनी महोत्सवाचे वेळापत्रक पाहून, २१ डिसेंबर दुपारी दोन ते तीन ही एक तासाची  वेळ निश्चित केली होती . लेखक डॉ राजन हर्षे हे फर्ग्युसनचे माजी विद्यार्थी असल्याने आणि कार्यक्रमाला येणारा वाचक समूह लक्षात घेऊन फर्ग्युसनचे ॲम्फी थियेटर हे स्थळही कार्यक्रमासाठी तेव्हाच त्यांनी निश्चित केले होते.  कार्यक्रमाचे पाहुणे आणि स्वरुप कळविण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे, चर्चेचे स्वरूप व वक्त्यांची नावे त्यांना दुसऱ्या दिवशी कळवण्यात आली होती. अलाहाबाद विद्यापीठाचे माजी कुलगुरू असलेले लेखक डॉ. राजन हर्षे, नांदेड येथील स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर , मुंबई विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ सतीश बागल हे चौघे या पुस्तकावर चर्चा करणारे होते. डॉ संकल्प गुर्जर हे या चर्चेचे संचलन करणार होते.

हेही वाचा >>> पिंपरी : पदपथांवर कोट्यवधींचा खर्च, तरीही पादचारी रस्त्यावरच!  काय आहे कारण?

कार्यक्रमाच्या दोन दिवस आधी साधनाचे सुहास आणि सुदाम हे दोन सहकारी आकांक्षा यांना भेटले तेव्हा त्यांना कार्यक्रमाचे स्थळही (अँफी थियेटर ऐवजी बुक कट्टा ) त्यांनी दाखवले होते.  मात्र कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी सायंकाळी सात वाजता आकांक्षा बिष्णोई यांनी विनोद शिरसाठ यांना दूरध्वनीवरून कळवले की, महोत्सवाच्या ठिकाणी अनेक कार्यक्रम होणार असल्याने तुमचा कार्यक्रम रद्द करावा लागत आहे. या पुस्तकाचा विषय, कार्यक्रमाला येणारे निमंत्रित  वक्ते आणि साधना प्रकाशनचा पाऊण शतकाचा वारसा हे सर्व लक्षात घेता,  कार्यक्रम रद्द झाल्याचे असे ऐनवेळी सांगणे योग्य नाही, असे साधनाच्या संपादकांनी आकांक्षा यांना सांगितले. तेव्हा, वरिष्ठांशी बोलून थोड्या वेळाने फोन करून सांगते, असे त्या म्हणाल्या. मात्र अर्धा तासाने दूरध्वनी करून त्यांनी, कार्यक्रम रद्दच करावा लागत आहे असे कळवले. या निर्णयाचा निषेध करून साधना प्रकाशनने सर्व वक्त्यांची वेळ आणि सभागृहाची उपलब्धता हे सर्व ठरवले असून, तेच सर्व वक्ते घेऊन हा कार्यक्रम आता शुक्रवारी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सभागृह येथे सकाळी साडेदहा वाजता आयोजित करीत आहोत, असे विनोद शिरसाठ यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Discussion program on book paksi unhacha by rajan harshe at pune book festival cancelled pune print news vvk 10 zws