सातत्याने नसला तरी अधूनमधून भुरभुर पडणारा पाऊस आणि त्यामुळे झालेला वातावरणबदल यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाळी आजारांचे रुग्ण दिसू लागले आहेत. पोटाचे विकार आणि विषाणूजन्य तापाबरोबरच डेंग्यूसदृश लक्षणे दिसणारे रुग्णही बाह्य़रुग्ण विभागांमध्ये बघायला मिळत असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदवले.
पोटाच्या विकारांमध्ये उलटय़ा, मळमळ, पोट दुखणे, जुलाब आणि काही रुग्णांमध्ये ताप येऊन पोट बिघडण्याचे लक्षणही दिसत आहेत, तर विषाणूजन्य संसर्गाच्या रुग्णांमध्ये ताप, अंग व सांधेदुखी, सर्दी-पडसे, खोकला, घसा दुखणे, घसा खवखवणे अशी लक्षणे दिसत असल्याचे डॉ. राजेश आनंद यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘डेंग्यूसदृश ताप असलेल्या रुग्णांमध्ये सर्दी-खोकला किंवा श्वसनसंस्थेचा संसर्ग नसतानाही अंगदुखी, अचानक थंडी वाजून खूप ताप येणे, गळून जाणे अशी लक्षणे दिसत आहेत. रुग्णाच्या घराभोवतीचे वातावरण कसे आहे, तसेच डास चावण्याबद्दलही प्रश्न विचारूनही डेंग्यूबद्दल थोडीशी कल्पना येते. शिवाय चाचण्यांनंतर ताप कोणता याची खात्री होतेच. केवळ पावसात भिजल्यामुळे आजारी पडणाऱ्या रुग्णांमध्ये सहसा विषाणूजन्य ताप बघायला मिळतो.’
डॉ. सचिन यादव म्हणाले, ‘जुलाब, उलटय़ा आणि कावीळ हे पोटाचे विकार दिसत असून साधा फ्लू, सर्दी-खोकला आणि न्यूमोनियाचेही रुग्ण बघायला मिळत आहेत. डेंग्यूला काही प्रमाणात सुरुवात झाल्याचे दिसत आहे. तीव्र ताप, अंग प्रचंड दुखणे, हाडे दुखणे, डोळ्यांच्या मागे दुखणे, अंगावर पुरळ येणे याचा डेंग्यूच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये समावेश होतो. चार-पाच दिवसांनंतर शौचाला काळ्या रंगाची होणे, दातांमधून किंवा लघवीवाटे रक्त जाणे ही रक्तातील प्लेटलेट कमी होण्याची लक्षणे या रुग्णांमध्ये दिसतात. फ्लूमध्येही अंगदुखी आणि तीव्र ताप दिसू शकत असल्यामुळे काही वेळा फ्लू आणि डेंग्यूमध्ये फरक ओळखणे अवघड जाते. परंतु फ्लूमध्ये सहसा सर्दी, खोकला, घसादुखी दिसते. विषाणूजन्य गॅस्ट्रोएंटेरायटिसमध्येही जुलाब, उलटय़ांबरोबर अंगदुखी दिसते.’
पावसाळी आजारांना प्रतिबंध कसा कराल?
– बाहेरचे उघडय़ावरचे अन्न-पाणी शक्यतो टाळा.
– शक्य झाल्यास उकळवलेले किंवा गाळलेले पाणी प्या.
– कोणतीही गोष्ट अति खाण्यापिण्यात आली तरीही बदलत्या वातावरणात त्रास होऊ शकतो.
– डेंग्यू टाळण्यासाठी घराच्या किंवा कार्यालयाच्या आसपास पाणी साठून डासांची पैदास होऊ देऊ नका.
– सार्वजनिक ठिकाणी जाताना विषाणूजन्य संसर्गापासून काळजी घ्या
जुलैत डेंग्यूचे ४९ संशयित रुग्ण
पालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार चालू महिन्यात गुरूवापर्यंत शहरात डेंग्यूचे ४९ संशयित रुग्ण आढळले आहेत. यातील २६ संशयित डेंग्यूरुग्ण याच आठवडय़ात सापडले आहेत. विषाणूजन्य काविळीचे १९ रुग्ण या महिन्यात सापडले आहेत. तर, जुलैत आढळलेल्या स्वाइन फ्लू रुग्णांची संख्या ३ आहे.