समाविष्ट गावातील टेकडय़ांवर बांधकाम परवानगीची शिफारस करण्यासंबंधीचा
टेकडय़ांवर बांधकाम परवानगीचा विषय सभेत येताच मनसे, भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेविका महापौरांच्या आसनासमोर धावल्या आणि पुण्यात साडेचार वर्षांच्या बालिकेवर झालेल्या बलात्काराच्या निषेधार्थ सभा तहकूब करा, असा आग्रह त्यांनी धरला. पाठोपाठ घोषणाबाजीही सुरू झाली. त्यानंतर काँग्रेसकडून सभा तहकुबी देण्यात आली. मात्र ४९ विरुद्ध ३८ मतांनी ही तहकुबी फेटाळण्यात आली. त्यामुळे काँग्रेस, मनसे आणि सेनेचे सदस्य अधिकच चिडले.
तहकुबी मांडण्यात आली तोपर्यंत सभेत तातडीचे प्रश्न, लेखी प्रश्न असे तासभराचे कामकाज पूर्ण झालेले होते आणि पंचेचाळीस विषय देखील मंजूर झाले होते. ही बाब सभागृहनेता सुभाष जगताप यांनी लक्षात आणून दिली आणि बीडीपीच्या विषयावर निर्णय घेऊन नंतर लगेच सभा तहकूब करू, अशी भूमिका त्यांनी घेतली. असे घाणेरडे राजकारण विरोधकांनी करू नये अशीही विनंती त्यांनी केली. मात्र, नगरसेविकांनी लगेच घोषणाबाजी सुरू करून कोणत्याही परिस्थितीत सभा तहकूबच झाली पाहिजे, असा आग्रह धरला. हा गोंधळ आणि शाब्दिक चकमकी तासभर सुरू होत्या.
नगरसेविकांचे असभ्य वर्तन
अखेर प्रस्तावावर मतदान घ्या, असा आदेश नगरसचिव सुनील पारखी यांना महापौरांनी दिला. त्यामुळे पारखी यांनी मतदान पुकारले. मतदानाची प्रक्रिया सुरू होताच मनसेच्या नगरसेविका पुन्हा गोंधळ घालू लागल्या. काही नगरसेवकांनी नगरसचिवांचा ध्वनिवर्धक मोडून टाकला. तरीही त्यांनी मतदानाची प्रक्रिया सुरू ठेवली. तोवर मनसेच्या सुशीला नेटके, रुपाली पाटील आदी नगरसेविका त्यांच्या अंगावर धावून गेल्या आणि नेटके यांनी पारखी यांना धक्काबुक्की करून व्यासपीठावरून ढकलले.
इकडे हा प्रकार सुरू असतानाच काँग्रसचे आबा बागूल हेही पारखी यांना अडवण्यासाठी धावून जाऊ लागले. त्यांना अडवण्यासाठी राष्ट्रवादीचे अन्य नगरसेवक धावले. या प्रकारात उभयतांमध्ये शारीरिक चकमक झडली. त्यानंतरही पारखी यांना विरोध करण्याचा प्रयत्न मनसेकडून सातत्याने होत होता. अखेर सुनील केसरी आणि अन्य काही अधिकारी धावून गेले आणि त्यांनी पारखी यांना सभागृहाबाहेर नेले. त्यानंतर सहायक नगरसचिवांनी पुढील कामकाज सुरू केले. त्यांच्याही अंगावर धावून जाण्याचे प्रकार नगरसेवकांनी केले.
या मतदानापूर्वी काँग्रेस, मनसे आणि सेनेच्या नगरसेवकांनी सभात्याग केला होता. मतदानानंतर बलात्काराचा निषेध करणारी तहकुबी मुक्ता टिळक आणि मनीषा घाटे यांनी मांडली. त्यावर भाषणे होऊन नंतर सभा तहकूब करण्यात आली.
नगरेसवकांचे सभेतील ‘उद्योग’
– नगरसचिवांना धक्काबुक्की
– महापौरांना तासभर घेराव
– गलिच्छ भाषा, हीन शेरेबाजी
– ध्वनिवर्धकाची मोडतोड