पुणे : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या पाच माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. माजी नगरसेवकांच्या या प्रवेशामुळे शहर भाजपमधील स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. पक्षवाढीसाठी वर्षानुवर्षे काम करायचे आणि निवडणूक आल्यानंतर बाहेरून पक्षात आलेल्यांना तिकीट द्यायचे हे बरोबर नाही, असे म्हणत काही पदाधिकाऱ्यांनी यावर नाराजी व्यक्त केली. यामुळे येणाऱ्या काळात भाजपमध्ये देखील निष्ठावंत विरुद्ध बाहेरचा असा संघर्ष होण्याची शक्यता आहे.

शिवसेना (ठाकरे) पक्षाचे माजी नगरसेवक विशाल धनवडे, पल्लवी जावळे, बाळा ओसवाल, प्राची अल्हाट, संगीता ठोसर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपची वाट धरली आहे. मुंबई येथे भाजपच्या पक्ष कार्यालयात प्रभारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार सुनील कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत या पाच नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या या माजी नगरसेवकांना आगामी महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यााचा शब्द देण्यात आल्याची चर्चा आहे. यामुळे भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. या नाराजीमुळे गेल्या आठवड्यात होणारे हे पक्षप्रवेश देखील काही काळ लांबले होते.

हे ही वाचा… पिंपरी : तिसऱ्या अपत्यामुळे सहायक आयुक्ताने गमावली नोकरी

या पाच माजी नगरसेवकांनी पक्षाची साथ सोडल्याने पुण्यात शिवसेना (ठाकरे) पक्षाला धक्का मानला जात आहे. शिवसेना (ठाकरे) पक्षांमध्ये वरिष्ठांकडून होत असलेली घुसमट, वरिष्ठांकडून पुण्याकडे होणारे दुर्लक्ष यामुळे शिवसेना (ठाकरे) पक्षाला सोडचिठ्ठी देत आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आणि केंद्रात सत्ताधारी असलेल्या भाजपमध्ये या नगरसेवकांनी प्रवेश केला आहे.

हे ही वाचा… पत्नीच्या छळामुळे तरुणाची आत्महत्या, पत्नी,सासूसह मेहुणीविरुद्ध गुन्हा दाखल

पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून महापालिकेत बाहेरून आलेल्यांना संधी देऊ नका, अशी भूमिका भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची असून ही नाराजी वरिष्ठांपर्यंत पोहचली आहे. त्यामुळे भाजपमध्ये प्रवेश केलेल्या प्रत्येकालाच महापालिकेची उमेदवारी मिळेलच, असे नाही असे भाजपच्या शहरातील पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Story img Loader