पुणे : लोकसभा निवडणूक होऊन जवळपास दीड महिन्यांचा कालावधी उलटून गेला. त्यानंतर प्रत्येक पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने बैठका आणि दौरे सुरू केले आहेत. तर विद्यमान आणि इच्छुक नेते मंडळींनीदेखील आपापल्या विधानसभा मतदारसंघात कार्यक्रम घेण्यास सुरुवात केली आहे. या सर्व घडामोडीदरम्यान पुणे शहरातील पर्वती विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा माधुरी मिसाळ या आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. तर त्याच मतदारसंघातील भाजपचे नेते श्रीनाथ भिमाले यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी म्हणून शहरात ओळख आहे. श्रीनाथ भिमाले यांनी लढणार आणि जिंकणार अशी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. या पोस्टबाबत पुणे शहराच्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.
याबाबत भाजप नेते श्रीनाथ भिमाले यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, मी मागील ३० वर्षांपासून राजकीय जीवनात काम करीत आलो आहे. आजवर पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी चांगल्या प्रकारे पाडत आलो आहे. त्यामुळे मार्केटयार्ड परिसरात तीन वेळा नगरसेवक आणि पुणे महापालिकेमध्ये सभागृह नेता म्हणून काम केले आहे. त्या माध्यमातून पर्वती विधानसभा मतदारसंघात अनेक प्रकल्प आणले आहेत. तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे प्रचंड मतांनी निवडून आले. त्यामध्ये पर्वती विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्य देण्याच काम केल.
हेही वाचा – पुणे : अंत्यविधीतील गर्दीत भरधाव ट्रक घुसला; चिरडून तीन जणांचा मृत्यू
आजवर झालेल्या विधानसभा निवडणुकांत पक्षश्रेष्ठींकडे निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली. त्या प्रत्येक वेळी थांबण्याचे आदेश दिले. मात्र यंदा मला वरीष्ठ निवडणूक लढविण्याची संधी देतील. म्हणूनच मी लढणार आणि जिंकणार अशी पोस्ट केल्याचे भिमाले यांनी सांगितले.