पिंपरी- चिंचवड : शहरामध्ये महायुतीत तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. चिंचवड आणि भोसरी विधानसभेवरून राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप यांच्यात जुंपली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी चिंचवड विधानसभा आणि भोसरी विधानसभेवर दावा केल्यानंतर या मतदारसंघात भाजपची मोठी ताकद आहे. तिथं भाजप चे आमदार आहेत, त्यामुळे या ठिकाणी भाजपचेच उमेदवार असतील असं प्रत्युत्तर भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी दिलं आहे.
तसेच, चिंचवड विधानसभेची तयारी करत असल्याचं देखील शंकर जगताप यांनी म्हटले आहे. शंकर जगताप यांच्या वहिनी, अश्विनी लक्ष्मण जगताप सध्या चिंचवडच्या विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे आगामी काळात जगताप कुटुंबातून कोणाला उमेदवारी मिळते हे देखील पाहणं तितकंच औत्सुक्याचे ठरणार आहे.
आणखी वाचा-कल्याणीनगर अपघात प्रकरणातील मुलाचा बालसुधारगृहातील मुक्काम वाढणार?
विधानसभा निवडणुकी अवघ्याच तीन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. राज्यात महायुतीचे सरकार असून नुकत्याच झालेल्या लोकसभा देखील महायुतीने लढवली आहे. भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट आगामी काळात देखील लोकसभा निवडणूक एकत्र लढवणार असल्याचं नुकतच अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं होतं. असं असताना चिंचवड आणि भोसरी विधानसभेवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी दावा केला आहे. एवढेच नाही तर या संदर्भात आम्ही वरिष्ठ नेत्यांशी बोलणारा असून शेवटच्या क्षणापर्यंत आमचा दावा या दोन्ही विधानसभेवर असणार असा विश्वास व्यक्त केला आहे. स्वतः अजित गव्हाणे हे भोसरी विधानसभेसाठी इच्छुक असून त्यांनी आमदारकीची तयारी सुरू केली आहे.
आणखी वाचा-पुण्यानंतर पिंपरीतही पावसाच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून चिमुरड्याचा मृत्यू
दुसरीकडे भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी देखील अजित गव्हाणे यांना प्रत्युत्तर देत चिंचवड आणि भोसरी विधानसभेवर भाजपचे आमदार असून दोन्ही विधानसभेत भाजपची सर्वाधिक ताकद आहे. त्या ठिकाणी भाजपचेच उमेदवार असतील असा विश्वास व्यक्त केला आहे. तिढा वाढतच गेला तर वरिष्ठ नेते यातून मार्ग काढतील असंही जगताप म्हणाले आहेत. भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी चिंचवड विधानसभेतून लढणार असल्यास म्हटलं आहे. सध्या या चिंचवड विधानसभेत त्यांच्या वहिनी अश्विनी लक्ष्मण जगताप या विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे जगताप कुटुंबातून आगामी विधानसभेला कोणाला उमेदवारी मिळणार हा प्रश्न असताना शंकर जगताप यांनी मात्र विधानसभा लढवणार असल्याचं ठामपणे म्हटले आहे. यावर भाजप पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार किंवा तोडगा काढणार हे पाहावं लागणार आहे.