पिंपरी : महाविकास आघाडीचा पिंपरी मतदारसंघातील तिढा सुटला असून चिंचवड, भोसरीचा तिढा अद्यापही कायम आहे. भोसरीवरून रस्सीखेच सुरू आहे. महायुतीने शहरातील उमेदवार जाहीर करून आठ दिवस झाले. परंतु, महाविकास आघाडीतील गोंधळ कायम आहे. अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असतानाही महाविकास आघाडीत चिंचवड आणि भोसरी मतदारसंघावरून रस्सीखेच सुरू आहे. पिंपरीच्या जागेसाठी शिवसेना (ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख सचिन भोसले इच्छुक होते. मात्र, हा मतदारसंघ राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाला सुटला आहे. या पक्षाने माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत यांना उमेदवारी दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चिंचवडमधून राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाकडून लढण्यासाठी शिवसेनेचे माजी नगरसेवक राहुल कलाटे इच्छुक आहेत. त्यांच्या उमेदवारीसाठी शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे आग्रही आहेत. तर, निवडणूक लढविण्यासाठी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी शिवसेना (ठाकरे) पक्षात प्रवेश केला आहे. कलाटे यांना निवडणुकीचा अनुभव असल्याने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, असे सांगितले जाते. परंतु, कोणत्या पक्षाचे चिन्ह घ्यायचे यावरून उमेदवारीबाबत निर्णय झाला नसल्याची चर्चा आहे.

हेही वाचा >>>मेट्रोच्या कामानिमित्त बाणेर रस्ता परिसरात वाहतूक बदल

शिवसेना (ठाकरे) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात भोसरीच्या जागेवरून रस्सीखेच दिसून येत आहे. विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षातून राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात आलेले अजित गव्हाणे, भाजपमधून शिवसेनेत (ठाकरे) आलेले रवी लांडगे हे इच्छुक आहेत. दोन्ही पक्ष जागा सोडण्यास तयार नाहीत. गव्हाणे यांनी माजी आमदार विलास लांडे यांच्यासह समर्थक माजी नगरसेवकांना घेऊन जात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. प्रचाराची एक फेरी पूर्ण झाल्याचे त्यांनी पक्षाला सांगितले आहे. तर शिवसेना (ठाकरे) पक्षही भोसरीच्या जागेसाठी आग्रही आहे. तिन्हीपैकी शहरातील एक मतदारसंघ मिळावा अशी शिवसेना (ठाकरे) पक्षाची भूमिका आहे. त्यामुळे अजित गव्हाणे किंवा रवी लांडगे या दोघांपैकी एकाला थांबावे लागणार हे स्पष्ट दिसत आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dispute continues in chinchwad bhosari in mahavikas aghadi pune print news ggy 03 amy