महाराष्ट्र साहित्य परिषदेपाठोपाठ आता नाटय़ परिषदेमध्येही उमेदवार आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यामध्ये गुरुवारी वादावादी झाली. नाटय़ परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीतील एकगठ्ठा मतपत्रिका पेटीत टाकण्यावरून हा वाद झाला खरा. पण, अखेर उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे म्हणणे मान्य करणे भाग पडल्याने हे ‘पेल्यातील वादळ’ ठरले.
नाटय़ परिषदेच्या निडणुकीमध्ये पुणे विभागातून सहा उमेदवार निवडून द्यावयाचे आहेत. मात्र, मतदारांना मतपत्रिका मिळत नसल्याच्या तक्रारी वारंवार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे येत होत्या. त्यामुळे आता शेवटच्या टप्प्यामध्ये एकगठ्ठा मतपत्रिका येण्याची शक्यता गृहीत धरून अशा मतपत्रिका टाकणाऱ्याकडून त्या संदर्भातील अर्ज भरून घेण्याचे आदेश मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिले. त्यामध्ये संबंधिताचे नाव आणि ओळखीचा पुरावा याची नोंद करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याची अंमलबजावणी गुरुवारपासून करण्यात आली. मात्र, त्याविषयी कोणताही पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती असे आक्षेप उमेदवारांनी घेतले. निवडणूक प्रक्रियेच्या अखेरच्या टप्प्यात असे बंधन घालण्याचे कारण काय, या मुद्दय़ावरून उमेदवार आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यामध्ये वादावादी झाली. यासंदर्भात पुणे विभागाचे निवडणूक निर्णय अधिकारी शिरीषकुमार जानोरकर म्हणाले, मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हे आदेश दिल्याने आपण केवळ त्याची अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे आता वाद घालण्यात अर्थ नाही हे ध्यानात आल्यामुळे उमेदवारांनी देखील हा निर्णय मान्य केला आहे.

Story img Loader