काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासमोर मुख्यमंत्री व संपर्कमंत्र्यांविषयी झालेल्या तक्रारींचे पडसाद अजूनही उमटत आहेत. सोमवारी पुण्यात झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्याच मुद्दय़ावरून हर्षवर्धन पाटील यांनी अनेकांना फैलावर घेतले. नगरविकास खाते मुख्यमंत्र्यांकडे असूनही अनधिकृत बांधकामाविषयीचा निर्णय होत नसल्याची टीका राष्ट्रवादीकडून होते, असे सांगण्यात आले असता ‘ते’ मुख्यमंत्र्यांवर टीका करत असल्यास विजेचा खेळखंडोबा, सिंचन घोटाळा, कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्दय़ांवर राष्ट्रवादीचे अपयश तुम्ही दाखवून द्या, असे आदेश कार्यकर्त्यांना देण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
पुण्यात शासकीय विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत बरेच मानापमान नाटय़ घडले. हर्षवर्धन यांनी बऱ्याच दिवसांपासून मनात असलेली खदखद व्यक्त केली. राहुल यांच्यासमोर खोटय़ा तक्रारी केल्यावरून शहराध्यक्षांना जाब विचारण्यात आला. शासनस्तरावर अनेक महत्त्वपूर्ण निर्णय होतात, त्याचे श्रेय मिळावे म्हणून फलकसुध्दा लावले जात नाही. मेट्रोचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला, त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करण्यात आले नाही. एवढी पैशांची वानवा आहे का, कैलास कदमचा राजीनामा घेतला, आपल्याला कल्पना नव्हती. नागरिक न्यायालयात गेल्याने बांधकामाचा विषय चिघळला, त्यावरून सरकारला दोष देण्यात अर्थ नाही, असे अनेक मुद्दे बैठकीत चर्चिले गेले. पै-पाहुण्यांचे नाटय़ घडले. नगरसेवक म्हणजे पक्ष नाही, कार्यकर्त्यांना ताकद द्या, असे आवाहन झाले. काळेवाडीतील गावकीचा वाद पुन्हा उळाफून आला. काल आलेले कार्यकर्ते ज्येष्ठांची लायकी काढतात, असा सूर आळवण्यात आला. १९७८ पासून शहर काँग्रेसची सर्वाधिक वाईट अवस्था आज असल्याची तक्रार एका ज्येष्ठ कार्यकर्त्यांने केली. पत्रकारांना बातम्या पुरवल्या तर माहिती काढू, अशी तंबी सर्वाना देण्यात आल्याने उशिरापर्यंत अनेकजण दूरध्वनीला प्रतिसाद देत नव्हते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा