रेल्वेच्या तत्काळ तिकिटाच्या यंत्रणेमध्ये सध्या मोठा गोंधळ निर्माण झाला असून, त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. तत्काळ तिकिटासाठी देण्यात येणाऱ्या टोकनची बदलण्यात आलेली वेळ गैससोयीची असल्याने प्रवासी हैराण झाले आहेत. उन्हाळी सुट्टय़ांमुळे सध्या प्रवाशांची संख्या वाढली असताना तत्काळ तिकिटांबाबतच्या गोंधळात आणखी भर पडत आहे.
रेल्वेने अलीकडेच तत्काळ तिकिटांचा कालावधी २४ तासांवर आणला आहे. गाडी सुटण्याच्या चोवीस तास आधीपासून सध्या तत्काळ तिकीट उपलब्ध होतात. पुणे रेल्वे स्थानकावर तत्काळ व सर्वसाधारण तिकिटांच्या आरक्षणासाठी एकाच खिडकीत व्यवस्था करण्यात आली आहे. पूर्वी सकाळी आठ वाजता तत्काळ व सर्वसाधारण तिकिटांचे आरक्षण आठ वाजता खुले करण्यात येत होते. त्याचप्रमाणे तत्काळसाठी रांगेत थांबलेल्या नागरिकांना साडेनऊला रांगेतील क्रमांकानुसार टोकन दिले जात होते. त्यानंतर सकाळी दहा वाजता टोकननुसार तत्काळ तिकिटाचे आरक्षण केले जात होते.
सध्या टोकन देण्याची वेळ बदलण्यात आली आहे. त्यामुळे गोंधळात भर पडल्याचे दिसून येत आहे. तत्काळ व सर्वसाधारण तिकिटांचे आरक्षण करण्यासाठी सकाळी एकाच रांगेत असलेल्या नागरिकांना टोकन दिले जातात. सकाळी आठ वाजता सर्वसाधारण तिकिटांचे आरक्षण सुरू होते. मात्र, तत्काळ तिकीट काढायचे असल्यास सकाळी दहापूर्वी घेतलेले टोकन ग्राह्य़ धरले जात नाही. तत्काळचे आरक्षण सकाळी दहाला सुरू होते व त्याच वेळेला टोकन दिले जाते. या गडबडीतच अवघ्या पाच ते दहा मिनिटांत तत्काळचे आरक्षण संपते. सकाळी लवकर रांगेत पुढे उभे राहून दहापूर्वी टोकन घेतले, तर ते टोकन ग्राह्य़ धरले जात नसल्याने पुन्हा रांगेत मागे जाऊन दहानंतरचे टोकन घ्यावे लागते. त्यामुळे अनेकांचे तत्काळ तिकिटांचे आरक्षण होत नाही. सध्या उन्हाळी सुट्टय़ा असल्याने देशभरात विविध ठिकाणी जाण्यासाठी प्रवाशांची गर्दी वाढली आहे. तत्काळबाबत रेल्वेच्या या बदललेल्या व्यवस्थेबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Story img Loader