पुणे: शहर आणि परिसरात सोमवारी रात्री झालेल्या ढगफुटी सदृश पावसानंतर जलमय झालेल्या कोंढवा, कात्रज परिसरातील विस्कळित झालेला वीजपुरवठा महावितरणकडून भर पावसात रात्रभर दुरुस्ती कामे करून सुरळीत करण्यात आला. सोमवारी रात्री नऊच्या सुमारास ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस झाला. काही वेळातच विविध भागामध्ये पाणी साचले. घरांमध्ये तसेच सोसायट्यांमध्ये पाणी शिरले. या पावसाचा महावितरणच्या वीजयंत्रणेला तडाखा बसला. त्यामध्ये प्रामुख्याने रास्ता पेठ, पद्मावतीसह पर्वती, बंडगार्डन विभागामधील २२ केव्ही क्षमतेच्या ११ वाहिन्यांचा वीजपुरवठा खंडित झाला होता.
हेही वाचा >>> पुण्याला झोपडून काढणाऱ्या ढगाची उंची ११ किमी; जाणून घ्या नेमकं घडलं काय?
महावितरणचे अभियंते आणि कर्मचाऱ्यांनी रात्रभर पावसात दुरुस्ती कामाला वेग देत पहाटेपर्यंत टप्प्याटप्प्याने सर्वच अकरा वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा सुरु केला. तसेच सकाळी दहा वाजेपर्यंत जलमय परिसरातील ९९ टक्के ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. दुपारी चार वाजेपर्यंत उर्वरित ग्राहकांकडील वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात आले. आणखी दोन दिवस पाऊस राहणार असल्याची शक्यता असल्याने महावितरणचे पुणे परिमंडलातील अभियंते आणि कर्मचाऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा तसेच वीज सुरक्षेबाबत उपाययोजना करण्यासाठी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पाहा व्हिडीओ –
सोमवारी रात्रीच्या मुसळधार पावसाच्या तडाख्यामुळे रास्ता पेठ विभागातील एनआयबीएम परिसर, सह्याद्री पार्क, साळुंखे विहार, कोंढवा, जेके पार्क, कुमार पृथ्वी, काकडेवस्ती, नंदादीप सोसायटी, कौसरबाग, टिळेकरनगरचा काही परिसर, सेरेना सोसायटी, दगडेवस्ती, धर्मावत पेट्रोल पंप परिसर, सांकला सोसायटी, शांतीबन, साईबाबानगर परिसर तसेच पद्मावती विभागातील गंगाधाम, भिलारेवाडी, कात्रज, इस्कॉन मंदिर परिसर, सहकारनगर, वाळवेकरनगर आदी परिसरातील वीजयंत्रणेजवळ पाणी साचल्यामुळे वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. रस्त्याच्या कडेला असलेल्या फिडर पिलर, रिंगमेन युनिटमध्ये तसेच अनेक सोसायट्यांच्या मीटरबॉक्समध्ये व घरांमध्ये पाणी शिरले. काही ठिकाणी वीजयंत्रणेवर झाडाच्या मोठ्या फांद्या पडल्या. सुरक्षिततेचा उपाय म्हणून महावितरणकडून वीजपुरवठा बंद ठेवल्यामुळे रास्ता पेठ आणि पद्मावतीसह पर्वती, बंडगार्डन विभागातील एकूण १८४ रोहित्रांवरील सुमारे ७७ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र महावितरणचे अभियंते व कर्मचाऱ्यांनी रात्रभर भर पावसात काम करून सकाळी आठ वाजेपर्यंत १६२ रोहित्रांवरील सुमारे ७० हजार ५०० ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत केला.