मध्य भागातील प्रमुख चाैकात वाहतूक नियंत्रणासाठी बांधण्यात आलेले ट्रॅफिक बूथ वापराविना अडचणीचे ठरले आहे. या बूथचा वापर वाहतूक पोलिसांकडून केला जात नसून गर्दीच्या चौकातील बांधण्यात आलेल्या बूथमुळे वाहतुकीस अडथळा होत आहे.मध्य भागातील शिवाजी रस्त्यावरील लाल महाल चौक, हुतात्मा स्मारक चौक (बुधवार चौक), बेलबाग चौक, बाजीराव रस्त्यावरील अप्पा बळवंत चौकासह वेगवेगळ्या भागात एका संस्थेकडून वाहतूक पोलिसांसाठी दोन महिन्यांपूर्वी ट्रॅफिक बूथ बांधण्यात आले. गजबलेल्या चौकात उन, वारा, पावसापासून वाहतूक पोलिसांचे संरक्षण व्हावे, या विचाराने संस्थेकडून पोलिसांना बूथ बांधून देण्यात आले आहेत. मात्र, या बूथचा वापर वाहतूक पोलिसांकडून होत नसून प्रमुख चौकात बांधण्यात आलेले बूथ अडचणीचे ठरले आहेत.मध्य भागातील वाहतुकीची कोंडी आणि नियंत्रणासाठी बांधण्यात आलेल्या या बूथमध्ये पोलीस नसतात. चौकात थांबून पोलीस वाहतूक नियंत्रण करत असल्याचे पाहायला मिळाले.
मध्य भागातील शिवाजी रस्ता, बाजीराव रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते. या भागातून चालणे देखील अवघड असते. याबाबत वाहतूक शाखेच्या नियोजन विभागातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन बोत्रे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मध्यभागातील वाहतूक बूथची पाहणी करण्यात येईल. या बूथमुळे वाहतुकीस अडथळा होत असेल, तर त्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देऊन योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.
हेही वाचा >>>पुणे: शंभर कृत्रिम झाडे घेण्याचा निर्णय स्थगित
बूथ चुकीच्या पद्धतीने बांधल्याच्या तक्रारी
मध्यभागातील गजबजलेल्या रस्त्यावर बांधण्यात आलेले बूथ चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आल्याच्या तक्रारी वाहतूक पोलिसांकडून नाव न सांगण्याच्या अटीवर करण्यात आल्या आहेत. मुळात मध्य भागातील रस्ते आणि चौक अरुंद आहेत. या बूथची बांधणी चुकीच्या पद्धतीने करण्यात आली आहे. वाहनांची संख्या, वाहतुकीचा ताण विचारात घेतल्यास प्रत्यक्षात चौकात थांबून वाहतूक नियंत्रण करणे सोपे ठरते, असे वाहतूक पोलिसांनी सांगितले.