एलबीटीला विरोध करण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनात फूट पडल्याचे चित्र पुढे आले आहे. खासदार गजानन बाबर यांच्या नेतृत्वाखाली शहरात ‘बेमुदत बंद’ पुकारण्यात आला असताना काही व्यापाऱ्यांनी राज्य ग्राहक कल्याण समितीचे अध्यक्ष आझम पानसरे यांच्याकडे दाद मागितली असून दिवसातील काही तास दुकाने सुरू ठेवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
एलबीटी रद्द करण्याच्या मागणीसाठी दुसऱ्या टप्प्यातील आंदोलन पेटले असताना त्याला वेगळे वळण मिळण्याचे संकेत आहेत. बाबर यांच्या नेतृत्वाखाली व्यापाऱ्यांचे फेडरेशन आंदोलनात आघाडीवर आहे. व्यापारी व शासनात दररोज संघर्ष होतो आहे. अशात, आकुर्डी, चिंचवड, भोसरी भागातील काही व्यापारी पानसरे यांना काळभोरनगर येथे भेटले. आम्हाला दुकाने सुरू ठेवायची आहेत. मात्र, फेडरेशनकडून आमच्यावर दबाव येतो आहे. दमदाटीची भाषा वापरली जाते. त्यामुळे आमचा नाईलाज झाला आहे. तुम्ही पुढाकार घ्या, दिवसातील चार तास दुकाने सुरू ठेवण्याची आमची तयारी आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली. व्यापाऱ्यांची ही फिर्याद ऐकल्यानंतर पानसरे यांनी एक निवेदन प्रसिध्दीस दिले. आंदोलन स्थगित करा अथवा दिवसातून चार तास दुकान सुरू ठेवा, असा पर्याय पानसरे यांनी व्यापाऱ्यांसमोर ठेवला आहे. सरकारचे धोरण सकारात्मक असून आणखी काही बदल मान्य करण्याचे संकेत शासनाने दिले आहेत. शासकीय स्तरावरील बोलणीच्या वेळी आपणही सहकार्य करू, अशी ग्वाही पानसरे यांनी दिली आहे. या पाश्र्वभूमीवर, एलबीटीवरून पुन्हा एकदा बाबर व पानसरे आमने-सामने आल्याचे दिसून येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा