‘संसदेत मी जे बोलतो त्याचा प्रसारमाध्यमांकडून चुकीचा अर्थ लावला जातो. बलात्काराच्या प्रश्नासंबंधी मी नुकतेच जे विधान केले त्याचाही महाराष्ट्रातील प्रसारमाध्यमांकडून विपर्यास झाला,’ असे मत केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी रविवारी व्यक्त केले.
‘केसरी’च्या हिंदी आवृत्तीचे प्रकाशन सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते झाले. वनमंत्री पतंगराव कदम, आमदार दीप्ति चवधरी, केसरीचे विश्वस्त संपादक डॉ. दीपक टिळक, सल्लागार संपादक एस. के. कुलकर्णी, रोहित टिळक, गीताली टिळक- मोने, प्रणिती टिळक या वेळी उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, ‘‘लेखणी ही पत्रकारितेची ताकद आहे. तिचा वापर समाज सुसंस्कृत व सुशिक्षित बनवण्यासाठी व्हायला हवा. स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वीची वर्तमानपत्रे कमी पानांची असत. आजची वर्तमानपत्रे म्हणजे कागदाचे गठ्ठे असतात. सगळीकडे- अगदी पहिल्या पानावरही जाहिरातीच पाहायला मिळतात. समाजाची नीतिमत्ता दिवसेंदिवस ढासळते आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण कुठे आहोत हे समाजाने तपासण्याची गरज आहे. या परिस्थितीत सरकार आणि कायदा कुठवर पुरे पडणार? देशात एक बलात्कार झाला, सारा देश पेटून उठला, त्यानंतर एक- दीड महिन्यात कडक कायदा आणला गेला. तरी अजूनही अशा घटना घडतच आहेत. अशा वेळी पत्रकारितेचा धर्म काय, याचा विचार व्हायला हवा. मी संसदेत जे काही बोलतो त्याचा प्रसारमाध्यमांकडून चुकीचा अर्थ लावला जातो. नुकतेच बलात्काराच्या प्रश्नासंबंधी मी जे विधान केले त्याचाही राज्यातील प्रसारमाध्यमांनी विपर्यास केला. आम्ही प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करूनही असे केले जाते तेव्हा त्याचा खेद वाटतो. आर्थिक स्थितीच्या बाबतीत चीन भारताच्या पुढे असला तरी आपला विकासदर ज्यांनी आपल्यावर राज्य केले त्यांच्यापेक्षा चांगल्या स्थितीत आहे. विकासदराच्या बाबतीत आपण अमेरिकेच्याही पुढे आहोत, आणखी पुढे जाऊ शकतो. आज गावांमधून शहरांकडे स्थलांतर होते आहे, ही चिंतेची बाब आहे. या स्थलांतरित जनतेला सांस्कृतिक विचार देण्याचा प्रयत्न पत्रकारितेने करणे आवश्यक आहे.’
‘मुदतपूर्व निवडणुकांची शक्यता नाही’
निवडणुका ठरलेल्या वेळीच होणार असल्याचे सांगून मुदतपूर्व निवडणुकांची शक्यता गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी फेटाळली आहे. सरबजितसिंग हल्ला प्रकरणी बोलताना ते म्हणाले, ‘‘ या प्रकरणी परराष्ट्र मंत्रालय आणि गृह मंत्रालय पाकिस्तान सरकारकडे सतत पाठपुरावा करीत आहे. मागे एकदा सरबजीतसिंग यांची बहीण व मुलगी यांना ‘तीन दिवसांत व्हिसा देऊन पाकिस्तानमध्ये बोलवून घेऊ’, असे आश्वासन पाकिस्तान सरकारकडून देण्यात आले होते. मात्र त्या आश्वासनाची पूर्तता झाली नव्हती. या गोष्टीचा निषेधही केंद्र सरकारतर्फे नोंदवण्यात आला होता. परंतु आता सरबजित सिंग यांच्या कुटुंबीयांना पाकिस्तानमध्ये पाठवण्याची व्यवस्था होते आहे.’’
माझ्या विधानांचा प्रसारमाध्यमांकडून विपर्यासच – सुशीलकुमार शिंदे
बलात्काराच्या प्रश्नासंबंधी मी नुकतेच जे विधान केले त्याचाही महाराष्ट्रातील प्रसारमाध्यमांकडून विपर्यास झाला,’ असे मत केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी रविवारी व्यक्त केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 29-04-2013 at 03:00 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Distortion of my statements by media sushilkumar shinde