राज्य शासनाच्या आदेशानुसार पुणे महापालिका क्षेत्रात सोमवार (१ एप्रिल) पासून स्थानिक संस्था कराची अंमलबजावणी सुरू होत असून सोमवारी ६१ हजार व्यापाऱ्यांना/व्यावसायिकांना या करासाठीचे नोंदणी प्रमाणपत्र संगणकाद्वारे दिले जाणार असल्याची माहिती उपायुक्त विलास कानडे यांनी रविवारी दिली.
शहरातील प्रत्येक व्यापाऱ्याने तसेच व्यावसायिकाने स्थानिक संस्था करासाठी (लोकल बॉडी टॅक्स- एलबीटी) महापालिकेकडे नोंदणी करणे सक्तीचे असून नोंदणीची ही प्रक्रिया १४ मार्चपासून सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेत आलेल्या छापील तसेच ऑन लाईन अर्जाची छाननी व मान्यतेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. ज्यांची मान्यता प्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्यांना संगणकाद्वारे नोंदणी प्रमाणपत्र दिले जाणार आहे. ही प्रक्रिया सोमवारपासून सुरू होईल. पहिल्या दिवशी ६१ हजार व्यापाऱ्यांना/व्यावसायिकांना एलबीटी नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, असे कानडे यांनी सांगितले.
एलबीटी नोंदणीसाठी आतापर्यंत सात हजार ८२६ अर्ज वितरित करण्यात आले असून त्यातील एक हजार ७६ अर्ज भरून आले आहेत. तसेच एक हजार ४७६ इतके अर्ज ऑन लाईन आले आहेत. विहित नमुन्यात अर्ज करून पात्रताधारक संभाव्य नोंदणीधारकांनी या करासाठीची नोंदणी लवकरात लवकर करून घ्यावी, असेही आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. महापालिकेतर्फे २ एप्रिलपासून सेवकवर्गाकडून प्रत्यक्ष सर्वेक्षण सुरू केले जाणार आहे. या पहिल्या सर्वेक्षणामध्ये व्यवसायांबाबतची माहिती संकलित केली जाईल. या सर्वेक्षणासाठी योग्य ते साहाय्य महापालिका सेवकांना करावे असेही आवाहन करण्यात आले आहे.