आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पुढाकाराने व चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट आणि इनलॅक्स बुधराणी रूग्णालय यांच्या विद्यमाने पिंपळे गुरव येथे आयोजित शिबिरात ३१४ अपंगांना कृत्रिम हात व पायाचे मोफत वाटप करण्यात आले.
आमदार जगताप व त्यांचे बंधू शंकर जगताप यांच्या पुढाकाराने गेल्या अनेक वर्षांपासून हा उपक्रम राबवण्यात येतो. करोनामुळे दोन वर्षे यात खंड पडला होता. परिस्थिती पूर्वपदावर आल्याने यंदा पिंपळे गुरवला हे शिबीर घेण्यात आले. ३१४ अपंगांना कृत्रिम हात व पायाचे (जयपूर फूट) तसेच व्हीलचेअर आणि ट्राय सायकलचे मोफत वाटप करण्यात आले. शिबिरात सहभागी अपंगांची तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे तपासणी करण्यात आली. कृत्रिम पाय बसवणे शक्य असेल त्यांच्या पायाचे मोजमाप करण्यात आले. त्यानुसार १८६ अपंगांना जयफूर फूट, ८५ अपंगांना कॅलिपर्स, २८ अपंगांना व्हीलचेअर आणि १५ अपंगांना ट्राय सायकलचे मोफत वाटप करण्यात आले.
आयोजक शंकर जगताप, माजी महापौर माई ढोरे, माजी पक्षनेते नामदेव ढाके, माजी नगरसेवक शशिकांत कदम, सागर अंगोळकर, नवनाथ जांभुळकर आदी उपस्थित होते.
यावेळी शंकर जगताप म्हणाले, समाजातील धडधाकट आणि आर्थिक स्थिती चांगली असलेल्या व्यक्तींनी पुढे येऊन आपल्याच भवतालच्या अपंगांना आधार देण्याची गरज आहे. ही गरज ओळखून हा उपक्रम राबवत आहोत.