पुणे : मराठा समाजातील व्यक्तींना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी आवश्यक पुरावे शोधण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार गठीत करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली. जिल्ह्यातील कुणबी नोंदी शोधण्याचे काम युद्धपातळीवर करण्याचे निर्देश यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. मागील १० महिन्यांत कुणबी नोंदी असलेल्या १२ हजार २९४ व्यक्तींना प्रमाणपत्राचे वितरण केल्याचेही त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम तसेच महानगरपालिका, सहकार विभाग, पुरातत्व विभाग आदी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा – पुणे: सोसायटीतील दुकानदाराकडून दहा वर्षांच्या मुलीशी अश्लील कृत्य

राजेश देशमुख म्हणाले की, कुणबी नोंदी शोधण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्याने अनुसरलेल्या कार्यपद्धतीनुसार कार्यवाही करावी व त्याच पद्धतीने विविध विवरणपत्रात अहवाल सादर करावा. १९४८ पूर्वीची आणि १९४८ ते १९६७ या कालावधीतील नोंदींची माहिती देण्यात यावी. नोंदी घेण्यासाठी तालुका स्तरावरही समित्यांची स्थापन करण्यात आली असून याबाबतच्या कार्यवाहीचा दररोज आढावा घेण्यात यावा. झालेल्या कार्यवाहीचा अहवाल दर आठवड्यात न्या. शिंदे समितीला पाठविण्यात येणार आहे. बहुतेक नोंदी मोडी लिपीत असल्याने त्या तपासण्यासाठी पुराभिलेख संचालनालयाकडून प्रशिक्षित व्यक्तींचे सहकार्य घेण्यात यावे, प्रमाणपत्र देताना अशा व्यक्तीचे प्रमाणपत्र लक्षात घेतले जाते. १३ प्रकारच्या विविध कागदपत्रांच्या आधारे ही तपासणी करावयाची आहे. तपासलेल्या नोंदींची माहिती संकेतस्थळावर टाकून न्या. शिंदे समितीलाही पाठवायची आहे. त्यामुळे संबंधित विभागांनी या कामासाठी पूर्णवेळ अधिकाऱ्याची नेमणूक करावी. मागासवर्गीय आयोगाकडून माहिती मागविल्यास तातडीने उपलब्ध करून द्यावी, असेही त्यांनी सांगितले. जिल्हा नियंत्रण कक्षात संबंधित विभागांनी आपला एक अधिकारी तालुक्याशी समन्वय करण्यासाठी नियुक्त करावा, असे निर्देशही त्यांनी दिले.

हेही वाचा – पुणे : हवेली तालुक्याने महायुतीला नाकारले, शरद पवार गटाच्या पॅनलच्या बाजूने स्पष्ट बहुमत

आतापर्यंत १२ हजार २९४ प्रमाणपत्रांचे वितरण : राजेश देशमुख

मागील १० महिन्यांत कुणबी नोंदी असलेल्या १२ हजार २९४ व्यक्तींना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिली. एकूण प्राप्त १२ हजार ९११ अर्जांपैकी ४६० अर्ज प्रलंबित असून १५७ अर्ज नाकारण्यात आले आहेत. या कामासाठी १९६७ पूर्वीचे महसुली पुरावे लक्षात घेण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली. तालुका स्तरावर यासंदर्भातील कार्यवाही सुरू असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Distribution of certificates to 12 thousand 294 persons having maratha kunbi records till now in pune district svk 88 ssb