काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारला सत्तेतून घालवण्यासाठी भाजप-शिवसेना-रिपाई महायुती परिवर्तन घडवून आणेल, असा विश्वास आहे. मात्र, निवडणुकीच्या तयारीसाठी महायुतीची जागावाटपाची बोलणी लवकर झाली पाहिजे, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. आरपीआयला उपमुख्यमंत्रिपदासह २० टक्के सत्तेची भागीदारी हवी आहे. पक्षातर्फे देशभरात लोकसभेच्या दीडशे जागा लढविण्यात येणार असून जेथे ‘एनडीए’चे (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) उमेदवार असतील तेथे आमचा उमेदवार असणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
दोन जागा निवडून आल्या तरी पक्षाकडे निवडणूक चिन्ह राहू शकते. त्यामुळे  पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे, मुंबईतील दक्षिण-मध्य मुंबई आणि उत्तर मुंबई, ठाण्यातील कल्याण, मराठवाडय़ातील लातूर या लोकसभेच्या पाच जागांची मागणी करण्यात येणार आहे. ही तयारी करण्यासाठी जागावाटपाची बोलणी लवकर झाली पाहिजे, असे सांगून रामदास आठवले म्हणाले, काँग्रेसबरोबर युती असताना आरपीआयला नेहमी पडणाऱ्या जागा दिल्या जात असत. ज्या ठिकाणी आमचे उमेदवार असायचे त्या जागांवर काँग्रेसचेच बंडखोर अपक्ष म्हणून रिंगणात असायचे. त्यामुळे आमचे उमेदवार कधी निवडून आले नाहीत. महायुतीकडून असे वर्तन घडणार नाही ही अपेक्षा आहे. रिपब्लिकन पक्षाला डावलून सत्ता परिवर्तन होऊ शकत नाही हे सध्याचे वास्तव आहे. विधानसभेसाठी ६५ जागांची यादी तयार असून ३०-३५ जागा मिळाव्यात अशी आमची मागणी आहे.
महायुतीमध्ये ‘मनसे’ला समाविष्ट करून घेण्याचा विचार आमच्यासमोर नाही. पण, शेतकरी कामगार पक्ष, शेतकरी संघटना आणि राष्ट्रीय समाज पक्ष उत्सुक असतील तर, त्यांना महायुतीमध्ये समाविष्ट करून घेता येईल, असे रामदास आठवले यांनी सांगितले. काँग्रेस-राष्ट्रवादी आपसात भांडत आहेत. त्यामुळे त्यांनी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका परस्परांविरोधात लढवाव्यात, अशी टिप्पणी त्यांनी केली. दुष्काळ निवारणासाठी केंद्राने पाच हजार कोटी रुपये राज्याला द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.
रिपब्लिकन पक्षातर्फे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानावर बुधवारी परिवर्तन मेळावा घेण्यात आला. दलित आणि महिलांवर अत्याचारांचे प्रमाण वाढत असून काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्तेतून घालवून रिपब्लिकन पक्ष परिवर्तन घडविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा रामदास आठवले यांनी मेळाव्यात दिला.