पिंपरीः वैधता संपलेली औषधे रुग्णांना वाटप करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी पालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात (वायसीएम) उघड झाला आहे. रुग्णांच्या जिवाशी खेळ करणारे असे धोकादायक प्रकार वारंवार घडत असावेत. तथापि, काहीच कारवाई होत नसल्याने कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे फावले असल्याची शंका विश्वसनीय सूत्रांकडून व्यक्त करण्यात येते.
हेही वाचा >>> पिंपरी: आठवले यांच्या उपस्थितीत आज रिपाइंचा महिला मेळावा
काही दिवसांपूर्वी एका गरोदर महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर रुग्णालय सोडताना तिला औषधांची चिठ्ठी लिहून देण्यात आली. तिचा पती औषध विभागात गेला असता, त्यांना औषधांची तीन पाकिटे देण्यात आली. ती औषधे मुदत संपलेली होती, असे त्यांच्या निदर्शनास आले. असा प्रकार इतरांबाबत होऊ नये म्हणून त्यांनी चव्हाण रुग्णालय पदव्युत्तर संस्थेचे अधिष्ठाता राजेंद्र वाबळे यांना तक्रार अर्ज दिला.
या तक्रारीनंतर चार जणांचे पथक औषध विभागात तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्यांनी तपासणी केल्यानंतर गोळ्यांचा मोठा साठा मिळून आला, ज्याची मुदत ऑगस्ट महिन्यातच संपली होती. त्याचप्रमाणे, मुदत संपलेल्या इतर जवळपास दोन हजार गोळ्यांचेही वाटप झाले होते, अशीही माहिती समोर आली. याबाबतचा अहवाल तपासणी पथकाने अधिष्ठातांना दिला. त्यानंतर पुढे काय झाले, याविषयी स्पष्टता नाही. असे प्रकार यापूर्वी झाले. मात्र, तेव्हा ठोस कारवाई झाली नाही, असे सांगण्यात येते. सध्या चव्हाण रूग्णालयाच्या कारभारावर कोणाचेच नियंत्रण नाही. या प्रकरणाचे गांभीर्य पाहता आतापर्यंत वैधता संपलेल्या किती औषधांचे वाटप झाले, यासह तत्सम इतर मुद्द्यांची सखोल तपासणी होण्याची गरज आहे. त्यादृष्टीने आयुक्त शेखर सिंह यांनी वैयक्तिक लक्ष घालावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.