हैद्राबाद संस्थान भारतात विलीन झाल्यावर मराठवाडय़ातील लोक कोणतीही अट न घालता विनासंकोच महाराष्ट्रात आले. त्यापुढचे उत्तरदायित्व महाराष्ट्रातील लोकांकडे होते, परंतु ते पूर्णत: कर्तव्यबुद्धीने निभावले गेले असे म्हणता येणार नाही, असे मत संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक व ८८ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
‘मराठवाडा समन्वय समिती’तर्फे गुरूवारी मराठवाडा मुक्तिदिन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. मोरे बोलत होते. मधुकर अण्णा मुळे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस, समितीचे अध्यक्ष बापू दुरगुडे, सचिव दत्ताजी मेहेत्रे, ‘वैभवशाली मराठवाडा’ या विशेषांकाचे संपादक सांदिपन पवार या वेळी उपस्थित होते. श्रीकृष्ण शिक्षण संस्थेचे सचिव दामोदर पतंगे, प्रगतिशील शेतकरी सुभाष मुळे, पुण्याच्या उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, आई फाउंडेशनचे संस्थापक संतोष गर्जे, युवा नाटककार राजकुमार तांगडे, उद्योजक महेश मलंग आदिंना या वेळी मराठवाडा भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
‘मराठवाडा मुक्तिदिन हा महाराष्ट्राच्या व भारताच्या इतिहासातील महत्त्वाचा दिवस आहे. हैद्राबाद संस्थान जोपर्यंत भारतात विलीन झाले नव्हते तोपर्यंत भारताच्या स्वातंत्र्याला परिपूर्णता मिळाली नव्हती. त्यासाठी मराठवाडय़ातील नागरिकांना झुंज द्यावी लागली. नव्या पिढीपर्यंत हा इतिहास पोहोचलेला नाही. तो पोहोचण्याची गरज असून र्सवकष इतिहास लिहिण्यासाठी भूमिपुत्रांनी पुढाकार घ्यावा. पारतंत्र्याच्या जोखडातून मराठवाडा तावून सुलाखून बाहेर पडला. महाराष्ट्रात येताना मराठवाडय़ातील लोक कोणतीही अट न घालता व विनासंकोच आले. त्यापुढचे उत्तरदायित्व महाराष्ट्राच्या लोकांकडे होते, परंतु ते पूर्णत: कर्तव्यबुद्धीने निभावले गेले असे म्हणता येणार नाही,’असे परखड मत डॉ. मोरे यांनी व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा