पुस्तकांचे थर रचून केलेली दहीहंडी.. पुस्तकहंडीबरोबरच मूठभर धान्य दृष्टिहीन बांधवांसाठी.. ससून रुग्णालयातील रुग्णांना दूधवाटप.. दृष्टिहीन मुलांसमवेत माणुसकीच्या स्पर्शाची दहिहंडी.. ध्वनिवर्धकांच्या भिंती आणि कर्णकर्कश्य आवाजातील गीते या गोष्टींना फाटा देत समाजातील उपेक्षित आणि वंचित घटकांची आठवण ठेवत त्यांना पारंपरिक सणांच्या आनंदात सहभागी करून घेणारी विधायक दहीहंडी सोमवारी साजरी झाली.
गोकुळ अष्टमीच्या दुसऱ्या दिवशी शहरातील विविध मंडळांतर्फे दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. मात्र, यंदा स्वातंत्र्यदिन (१५ ऑगस्ट) आणि दहीहंडी हे दोन्ही सण एकत्र आले आहेत. त्यामुळे मंगळवारी सकाळी ध्वजवंदन झाल्यावर दिवसभराच्या देशभक्तीपर वातावरणानंतर सायंकाळपासून विविध मंडळांच्या दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदांची पथके सज्ज होतील. ध्वनिवर्धकांच्या भिंती आणि कर्णकर्कश्य आवाजातील गीतांच्या तालावर नाचणारे युवक हे दृश्य शहरात सर्वत्र दिसते.
ध्वनिवर्धकाच्या भिंतींना पर्याय देण्याच्या उद्देशातून गेल्या काही वर्षांपासून दहीहंडीचा पारंपरिक सण साजरा करताना समाजातील उपेक्षित आणि वंचित घटकांनाही या आनंदामध्ये सहभागी करून घेण्याची प्रथा रुजत आहे. अशा पद्धतीने विधायक विचार करणाऱ्या मंडळांची संख्या वाढत आहे. वंदेमातरम संघटना आणि युवा फिनिक्स फाउंडेशनतर्फे स. प. महाविद्यालयामध्ये पुस्तक दहीहंडी हा विधायक उपक्रम राबविण्यात आला. स्वयंसेवी संस्थेतील बाळगोपाळांनी पुस्तकहंडी फोडली. या दहीहंडीतील पुस्तके गडचिरोली पोलिसांच्या सहकार्याने नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या ग्रंथालयासाठी देण्यात आली. महाराष्ट्र तरुण मंडळातर्फे लुई ब्रेल संस्थेतील दृष्टिहीन मुलांसमवेत माणुसकीच्या स्पर्शाची दहीहंडी हा उपक्रम राबविण्यात आला. या संस्थेतील मुलांसाठी धान्यवाटप आणि आर्थिक मदत करण्यात आली. त्याचप्रमाणे परिसरातील गरजू कुटुंबातील रुग्णाला आर्थिक मदत करण्यात आली. पोलीस उपायुक्त बसवराज तेली, पोलीस निरीक्षक बाळकृष्ण आंबुरे आणि सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ या वेळी उपस्थित होते.
शिवरामपंत दामले प्रशालेतर्फे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी निर्माण करण्यासाठी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी मूठ-मूठ धान्य गोळा केले. हे जमा झालेले ६०० किलो धान्य लुई ब्रेल संस्थेला देण्यात आले. या संस्थेतील दृष्टिहीन मुलांनी पुस्तकहंडी फोडली. पुणे विचारपीठ आणि साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिरातर्फे ससून रुग्णालयातील अस्थिरुग्ण विभागामध्ये १४०० लिटर सुगंधी दुधाच्या पिशव्यांची दहीहंडी उभारण्यात आली. तेजस उकरंडे या रुग्ण गोविंदाच्या हस्ते ही हंडी फोडून सर्व रुग्णांना दुधाचे वाटप करीत रुग्णसेवेची दहीहंडी साजरी करण्यात आली. धर्मादाय आयुक्त शिवाजीराव कचरे, सहधर्मादाय आयुक्त नवनाथ जगताप, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, मंडळाचे अध्यक्ष रवींद्र माळवदकर, अनुज भंडारी, रुग्णालयाचे उपअधिष्ठाता डॉ. मनजीत संत्रे या वेळी उपस्थित होते. शिवसाम्राज्य ढोल-ताशा पथक आणि देशप्रेमी मंडळातर्फे हुतात्मा मेजर ताथवडे उद्यानामध्ये अभिनव पुस्तकहंडी उभारण्यात आली होती. या हंडीतील पुस्तके गरजू संस्थांना देण्यात आली.