पिंपरी – चिंचवड शहरात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत. त्या अगोदर कार्यक्रमाला उपस्थित आणि येणाऱ्या नागरिकांना ‘ओआरएस’ची पाकिटे दिली जात असल्याने नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. या अगोदर पिंपरी-चिंचवड शहरात झालेल्या कुठल्याही राजकीय किंवा शासकीय कार्यक्रमात नागरिकांची एवढी काळजी घेण्यात आलेली नव्हती. अडीच वाजता सुरू होणारा कार्यक्रम अद्यापही सुरू झालेला नाही.
पिंपरी-चिंचवड शहरात शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत कार्यक्रम होणार आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या घराच्या जवळच हा कार्यक्रम आयोजित केला आहे. कार्यक्रमाला येणाऱ्या आणि उपस्थिती लावणाऱ्या नागरिकांची विशेष काळजी घेण्यात येत असून त्यांना ‘ओआरएस’ची पाकिटे देण्यात येत आहे. अशा प्रकारे नागरिकांची कधीच काळजी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.
मुळात अडीच वाजता असलेला कार्यक्रम साडेतीन वाजले तरी सुरू झालेला नाही. नागरिकांना चक्कर येऊ शकते याची खबरदारी घेऊन ‘ओआरएस’चे वाटप तर होत नाही ना असा प्रश्न विचारला जातो आहे. अशीच काळजी प्रत्येक पक्षातील नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी नागरिकांची घेतली तर ती नक्कीच कौतुकास्पद असेल यात काही शंका नाही.