पुणे : मिळकतकरातील चाळीस टक्क्यांची सवलत पूर्ववत ठेवण्याच्या निर्णयावर बुधवारी शिक्कामोर्तब झाल्याने एक मे पासून मिळकतकर देयकांचे वितरण करण्यात येणार आहे. मिळकतकर भरण्यासाठी ३० जून अंतिम मुदत असून या मुदतीमध्ये कर भरणा करणाऱ्या मिळकतकरधारकांना सर्वसाधारण करामध्ये किमान पाच ते कमाल दहा टक्क्यांची सवलत मिळणार आहे.
घरमालक स्वत: रहात असलेल्या मिळकतीच्या करामध्ये चाळीस टक्क्यांची सवलत १ एप्रिल २०२३ पासून कायम ठेवण्यात आली आहे. त्याचा फायदा किमान पाच लाखांहून अधिक मिळकतधारकांना होणार आहे. यासंदर्भातील निर्णय नवे आर्थिक वर्षे (१ एप्रिल) सुरू होण्यापूर्वी न झाल्याने महापालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागाने नवीन देयकांची छपाई आणि वितरणाची मुदत एक महिन्यांनी वाढविली होती. मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्याने आता एक मे पासून मिळकतकराच्या देयकांचे वितरण करण्यात येणार आहे.
मिळकतकर भरण्याची अंतिम मुदत ३० जून असून या कालावधीत एकरकमी कर भरणा करणाऱ्यांना सर्वसाधारण करात मिळकतकराच्या रकमेनुसार किमान पाच ते कमाल दहा टक्क्यांपर्यंची सवलत मिळणार आहे.