अवैध रीत्या साठा करून ठेवण्यात आलेल्या सुमारे सहा लाख रुपयांचा अन्नधान्याचा साठा अन्नधान्य वितरण कार्यालयाने केलेल्या कारवाईत जप्त करण्यात आला. त्याचप्रमाणे एक हजार लिटर रॉकेलही जप्त करण्यात आले आहे.
अन्नधान्य वितरण अधिकारी नीलिमा धायगुडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बालाजीनगर आणि पर्वती पायथा येथील जनता वसाहतीत असलेल्या स्वस्त धान्य दुकानांवर टाकलेल्या धाडीत ही कारवाई करण्यात आली. बालाजीनगर येथील एम. एल. नवघणे यांच्या दुकानावर धाड टाकली. धान्यसाठा आणि कागदपत्रांच्या तपासणीसाठी नवघणे यांना दुकान उघडण्यासाठी सांगितले. मात्र, हे दुकान खिमसिंग राजपुरोहित चालवत असल्याचे नवघणे यांनी सांगितले. मात्र, राजपुरोहित यांना दुकान चालविण्यास दिल्याच्या कागदपत्रांची पूर्तता केली नसल्याचे स्पष्ट झाले. दुकानाची पाहणी केली असता तेथे ५ हजार २०० किलो तांदूळ, १३ हजार ३०० किलो गहू आढळला. यापैकी ३ हजार किलो खासगी रीत्या विक्रीसाठी नेण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले. आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून न दिल्यामुळे संबंधित धान्यसाठा ताब्यात घेण्यात आला असून सहकारनगर पोलीस ठाण्यात नवघणे आणि राजपुरोहित यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पर्वती पायथा येथील जनता वसाहतीतील श्रीमती गुप्ता यांच्या दुकानावर धाड टाकली असता तेथे ३ हजार ४०० किलो गहू, २ हजार ९०० किलो तांदूळ आणि एक हजार लिटर रॉकेल आढळले. पण, कोणतीही कागदपत्रे उपलब्ध करून देऊ न शकल्याने हा धान्यसाठा ताब्यात घेण्यात आला असून दोन्ही दुकाने सील करण्यात आली आहेत. गुप्ता यांच्याविरुद्ध दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे नीलिमा धायगुडे यांनी सांगितले. या कारवाईत अन्नधान्य वितरण कार्यालयाचे मंडल अधिकारी सुरेश दांडगे, पुरवठा निरीक्षक राजेंद्र चिप्पुरे, शांताराम वाघ, सुरेश जगताप, राजश्री भंडारी आणि प्रेरणा पवार यांनी सहभाग घेतला.

Story img Loader