पुणे : देशातील एकूण वाहन विक्रीत एप्रिल महिन्यात ४ टक्के घट नोंदवण्यात आली आहे. दुचाकींच्या विक्रीत सर्वाधिक ७ टक्के तर प्रवासी वाहनांच्या विक्रीत १ टक्का घट झाली आहे, अशी माहिती फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशनने (एफएडीए) दिली आहे. याचबरोबर दुचाकीवरील वस्तू व सेवा कर (जीएसटी) कमी करण्याची मागणीही संघटनेने सरकारकडे केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशांतील वाहन विक्रीत दुचाकींचा वाटा ७५ टक्के आहे. एप्रिल महिन्यात दुचाकींच्या विक्रीत ८ टक्के घट झाली आहे. करोना संकटापूर्वी एप्रिल २०१९ च्या तुलनेत दुचाकी विक्री अद्याप १९ टक्क्याने कमी आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेतही म्हणावी तशी प्रगती होताना दिसत नाही. सध्या दुचाकींवर २८ टक्के जीएसटी आहे. तो कमी करून १८ टक्के करावा. म्हणजे विक्रीत वाढ होईल, असे एफएडीएने म्हटले आहे.

हेही वाचा >>>पुणे: कारखान्यांकडून २४४ कोटी लिटर इथेनॉल निर्मिती; साखर उत्पादनात महाराष्ट्र जगात तिसरा

याबाबत एफएडीएचे अध्यक्ष मनीष राज सिंघानिया म्हणाले,की मागील आर्थिक वर्षात प्रवासी वाहनांच्या विक्रीत विक्रमी वाढ झाली होती. परंतु, एप्रिलमध्ये विक्री मंदावली आणि मागील वर्षीच्या तुलनेत त्यात १ टक्का घट झाली. बीएस-६ मानकामुळे वाहनांच्या किमती वाढल्याचा परिणामही विक्रीवर झाला आहे. आठ महिन्यांत पहिल्यांदाच प्रवासी वाहनांच्या विक्रीत घट झालेली आहे. विक्री न झालेल्या वाहनांची संख्या वाढत असून, ती चिंतेची बाब आहे.

हेही वाचा >>>पुणे: शिरूर ते कर्जत नवा महामार्ग

कमी किमतीच्या प्रवासी वाहनांना अतिशय कमी मागणी आहे. दुचाकीवरून चारचाकीकडे वळणारा वर्ग यासाठी मोटार खरेदीसाठी सध्या तयार नसल्याचे दिसत आहे. एप्रिलमधील खराब हवामान, अवकाळी पाऊस यामुळे अनेक राज्यांत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळेही दुचाकी आणि प्रवासी वाहनांच्या विक्रीत घट झाली आहे. याचवेळी तीनचाकी वाहनांच्या विक्रीत एप्रिलमध्ये ५७ टक्के वाढ झाली आहे. ई-रिक्षांमुळे ही वाढ झाली आहे. ट्रॅक्टर आणि व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत अनुक्रमे १ व २ टक्के वाढ झाली आहे, असे सिंघानिया यांनी सांगितले.

मे महिना हा लग्नसराईचा काळ आहे. यामुळे या काळात दुचाकींची विक्री वाढणे अपेक्षित आहे. सरकारने जीएसटी कमी केल्यास ही विक्री आणखी वाढेल.- मनीष राज सिंघानिया, अध्यक्ष, एफएडीए

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Distributors association demands reduction in gst on two wheelers pune print news stj 05 amy
Show comments