पुणे : खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे लोकसभेची पोटनिवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र, निवडणूक जाहीर झाल्यास याबाबतची तयारी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
खासदार बापट यांचे २९ मार्च रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. केंद्रीय निवडणूक आयोगाने अद्याप पोटनिवडणूक जाहीर केलेली नाही. मात्र, राजकीय पक्षांकडून पोटनिवडणुकीबाबत दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. जिल्ह्यात नुकतीच कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघांची पोटनिवडणूक पार पडली. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने पोटनिवडणूक जाहीर झाल्यास निवडणूक घेण्याबाबतची तयारी दर्शविली आहे.
हेही वाचा >>> पैशाची उधळपट्टी करू नका, वायफळ खर्च करू नका: अजित पवार
पुणे लोकसभा मतदारसंघात वडगाव शेरी, शिवाजीनगर, कोथरूड, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबा पेठ या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. यापैकी कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक नुकतीच पार पडली आहे. चालू वर्षी ५ जानेवारी रोजी जिल्हा निवडणूक शाखेने अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली आहे. त्याशिवाय निवडणूक आयोगाची मतदान यंत्रे भोसरी येथील वखार महामंडळाच्या गोदामात ठेवण्यात आली आहेत. आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीला एक वर्ष उरले आहे. पुढील वर्षी एप्रिल-मे महिन्यात संपूर्ण देशभरात नियोजित लोकसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर होणार, की आगामी सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत ही जागा रिक्त ठेवली जाणार याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने अद्याप स्पष्ट केलेले नाही. मात्र, निवडणूक जाहीर झाल्यास जिल्हा प्रशासनाने तयारी केली आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघाचा आढावा
वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात चार लाख ३३ हजार २२ मतदार आहेत. शिवाजीनगरमध्ये दोन लाख ७४ हजार १०३, कोथरूडमध्ये तीन लाख ९१ हजार ५२०, पर्वतीमध्ये तीन लाख ३० हजार ८१९, पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये दोन लाख ६७ हजार ४८०, तर कसब्यात दोन लाख ७५ हजार ४२८ मतदार आहेत.