पुणे जिल्हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्टय़ा सर्वज्ञात आहे. पर्यटन स्थळ म्हणून पुण्याची ओळख जगभर पोहोचविण्याच्या दृष्टीने पर्यटन विभाग आहे. पुणे जिल्हा पर्यटन आराखडा यादृष्टीने महत्त्वपूर्ण ठरेल, असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी गणेश पाटील यांनी केले.
जागतिक पर्यटनदिनाच्या निमित्ताने एमटीडीसी व जिल्हा प्रशासनाच्या वतीने पर्यटन क्षेत्रातील विविध संस्था, व्यक्ती, प्रतिनिधी यांची बैठक व मार्गदर्शनपर व्याख्यान अप्पर जिल्हाधिकारी गणेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. तेव्हा ते बोलत होते. या वेळी एमटीडीसीच्या प्रादेशिक व्यवस्थापक नयना बोंदार्डे उपस्थित होत्या.
जिल्हा प्रशासन आणि एमटीडीसी यांच्या वतीने पुणे जिल्हा पर्यटन विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. याबाबतच्या प्रारूप जिल्हा पर्यटन बृहद् आराखडय़ाचे सादरीकरण जिल्हाधिकारी कार्यालय येथे नुकतेच झाले. या प्रारूप आराखडय़ात पुणे जिल्हा पर्यटन विकासाच्या दृष्टीने आवश्यक बाबींचा समावेश करण्यात आला आहे. यात जिल्हय़ातील सध्याची विविध प्रकारची प्रसिद्ध पर्यटन स्थळे तसेच भविष्यात विकसित होऊ शकणाऱ्या पर्यटन स्थळांची आकडेवारी व पर्यटकांची संख्या वाढविण्यासाठी उपाययोजना देण्यात आल्या आहेत. पर्यटकांसाठी उपलब्ध पायाभूत सुविधा आणि आवश्यक सुविधांबाबतही माहिती देण्यात आली आहे. येथील प्रख्यात पर्यटन स्थळांबरोबरच सभोवतालच्या व पर्यटनदृष्टय़ा आवश्यक लेझर शो, रोपवे, ध्वनिप्रकाश असे विविध प्रकल्प, विविध प्रकारची वस्तुसंग्रहालये पर्यटनस्थळी निर्माण होण्याबाबत माहिती देण्यात आली आहे. या स्थळांना एक, दोन व तीन दिवसांत पूर्ण होणाऱ्या पर्यटन सहलींबाबत नियोजनबद्ध माहिती देण्यात आली आहे. जिल्हय़ातील धरणांचा व जल क्षेत्रांचा जलक्रीडा प्रकाराच्या माध्यमातून विकसित करण्याबाबत तसेच भीमाशंकर अभयारण्य व पक्षिनिरीक्षण स्थळांचा विकास, कृषी पर्यटन स्थळांचा विकास, किल्ले व ऐतिहासिक वास्तूंचे जतन व संवर्धन करण्याबाबत विविध उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत.