करोना संसर्ग कमी झाला असल्याने नागरिकांकडून लसीकरणाला प्रतिसाद मिळत नसल्याने प्रशासन हैराण झाले आहे. लस पुरेश्या प्रमाणात उपलब्ध होत असूनही नागरिकांकडून लसीकरणाला प्रतिसाद मिळत नसल्याने लस वाया जाण्याचे प्रमाणही खूप आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागात मिळून तब्बल १३ लाख लाभार्थ्यांची दुसरी मात्रा शिल्लक आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पुणेकरांनी लशीच्या दोन्ही मात्रा घेण्याचे आवाहन मंगळवारी केले.

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागात गेल्या वर्षी १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना, तर दुसऱ्या टप्प्यात इतर विभागांमधील आघाडीच्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण सुरू करण्यात आले. त्यानंतर १ मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांसह ४५ वर्षांपुढील सहव्याधी असलेल्या व्यक्तींना लसीकरण करण्यास सुरुवात झाली, तर १ मेपासून १८ ते ४४ वयोगटाचेही लसीकरण सुरू करण्यात आले. लसीकरणासाठी शहरासह जिल्ह्यात ८३ लाख ४२ हजार ७०० अपेक्षित लाभार्थी आहेत. त्यापैकी आरोग्य कर्मचारी एक लाख ६३ हजार ३१९, इतर विभागांमधील आघाडीचे कर्मचारी दोन लाख ८४ हजार ३७७, ज्येष्ठ नागरिक (६० वर्षांवरील) १३ लाख २७ हजार ५००, ४५ ते ५९ वयोगटातील १८ लाख ८० हजार ६००, तर १८ ते ४४ या वयोगटातील ४६ लाख ८६ हजार ९०४ नागरिकांचा समावेश आहे.

याबाबत बोलताना जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, ‘संसर्ग कमी झाल्याने दुसरी आणि वर्धक मात्रा न घेणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात सात लाख नागरिकांनी अद्याप लशीची दुसरी मात्रा घेतलेली नाही, तर उर्वरित ग्रामीण भागात सहा लाख नागरिकांनी दुसरी मात्रा घेतलेली नाही. करोना संसर्ग कमी झाला असला, तरी अद्याप संपलेला नाही. युरोप, चीन, इंग्लंड या ठिकाणी अद्यापही करोनाचे नवे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे शहरासह जिल्ह्यात पुरेश्या प्रमाणात लस उपलब्ध असून नागरिकांनी लशीच्या दोन्ही मात्रा आणि त्यानंतर ८४ दिवसांनी वर्धक मात्रा घेणे आवश्यक आहे.’

वर्धक मात्रेसाठी पुरेश्या मात्रा

केंद्राने १८ वर्षांपुढील सर्व नागरिकांसाठी वर्धक मात्रा देण्याचे धोरण जाहीर केले आहे. मात्र, शहरातील खासगी रुग्णालयांकडून यापूर्वी लशी मोठ्या प्रमाणात वाया गेल्याचा अनुभव लक्षात घेऊन तूर्त नागरिकांचा प्रतिसाद पाहून लस खरेदीबाबत उत्सुक नसल्याचे निदर्शनास आले आहे. शासकीय लसीकरण केंद्रांवरही लस कमी पडत असल्याच्या तक्रारी येत होत्या. मात्र, सध्या पुरेश्या प्रमाणात लस उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार यांनी सांगितले.

Story img Loader