पुणे : विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणातील मार्गदर्शनाबरोबरच रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘समान संधी केंद्र’ स्थापन करण्याचे निर्देश सर्व महाविद्यालयांना देण्यात आले होते. मात्र पुण्यातील अद्यापपर्यंत तब्बल १ हजार १९२ महाविद्यालयांनी समान संधी केंद्र स्थापन केले नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे समान संधी केंद्र स्थापन न करणाऱ्या त्यांची संलग्नता रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनास दिले आहेत.

हेही वाचा >>> ते चक्क दिल्लीहून विमानाने येऊन पुण्यात करत होते घरफोडी! कोंढवा पोलिसांकडून दोघांना अटक

नवीन शैक्षणिक धोरण आणि बदलत्या शैक्षणिक संधीमुळे प्रत्येक महाविद्यालयात समान संधी केंद्र स्थापन करणे गरजेचे आहे. समाजकल्याण विभागाने जानेवारी २०२२ मध्येच यासंबंधीचे निर्देश दिले होते. समान संधी केंद्राद्वारे उच्च शिक्षणात सहाय्य, संशोधन संधी, सुधारात्मक प्रशिक्षण, स्पर्धा परीक्षा, कौशल्य विकास कार्यक्रम असे उपक्रम राबवणे अपेक्षित आहे. मात्र अजूनही अनेक महाविद्यालयांनी केंद्र स्थापन केले नसल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी देशमुख यांनी विद्यापीठाच्या कुलसचिवांना पत्राद्वारे निर्देश दिले. महाविद्यालयांनी ही केंद्र स्थापन न केल्यामुळे विद्यार्थ्यांना रोजगाराचा लाभ मिळणार नाही, याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले आहे. त्या अनुषंगाने पुणे विद्यापीठाने संलग्नित सर्व महाविद्यालयांना तातडीने समान संधी केंद्र स्थापन करण्याच्या पुन्हा एकदा सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यातील कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयांसह कृषी, वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि तांत्रिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांनीही आजवर एकही समान संधी केंद्र स्थापन केलेले नाही. यातील काही महाविद्यालये विद्यापीठाशी संलग्नित नाहीत. मात्र विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयांना तत्काळ ही केंद्र स्थापन करण्याची कार्यवाही करणे क्रमप्राप्त ठरणार आहे.

Story img Loader