पुणे : मुंबई- बेंगलुरू बाह्यवळण मार्गावर कात्रज नवीन बोगदा ते नवले पूलदरम्यान अपघातांना आळा घालण्यासाठी या ठिकाणचे दुभाजक तोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी मंगळवारी दिला. तसेच रस्त्याच्या बाजूच्या व्यावसायिकांनी सेवारस्ता आणि मुख्य मार्गिका यामधील दुभाजक (डिव्हायडर) तोडल्याचे आढळून आल्यास संबंधिताचा व्यवसाय परवाना रद्द करण्यात येणार असल्याचेही डॉ. देशमुख यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रस्ता सुरक्षा समितीच्या वतीने सुचविलेल्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी हा इशारा दिला. व्यवसायाला लाभ होण्यासाठी काही हॉटेलचालक तसेच अन्य व्यावसायिक मुख मार्गिका आणि सेवारस्ता यामधील दुभाजक तोडत असल्याचे निदर्शनास आले आहे. सेवा रस्त्यावरील वाहन अचानक थेट मुख्य मार्गिकेवर तसेच मार्गिकेवरील वाहन अचानक वळत असल्यामुळे अपघात होऊ शकतात. त्यामुळे या व्यावसायिकांच्या विरोधात कठोर कारवाईची शिफारस करावी. गरज पडल्यास संबंधितांचे व्यवसाय परवानेही रद्द करण्यात येतील, असेही डॉ. देशमुख यांनी सांगितले.

दरम्यान, वेगमर्यादा तसेच अन्य वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांना रोखून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी ग्रामीण पोलीस आणि शहर वाहतूक विभागाने जिल्हा नियोजन समितीकडे इंटरसेप्टर वाहनाचा प्रस्ताव तात्काळ द्यावा. या रस्त्यावर प्रत्येक मार्गिकेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून ते पोलीस विभागाच्या संगणकप्रणालीशी जोडावेत, जेणेकरुन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करता येईल, असेही आदेश डॉ. देशमुख यांनी या वेळी दिले.