लोकसत्ता वार्ताहर
बारामती : बारामती शहरातील शारदा प्रांगण येथे आज बारामती नगरपालिका यांच्या विद्यमाने महिला आर्थिक विकास महामंडळ आयोजित महिला बचत गट उत्पादित वस्तूंच्या जिल्हास्तरीय वस्तूचे भव्य प्रदर्शनाचे दोन वेळा उद्घाटन झाले आहे.
महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले, आणि काही काळा नंतर बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते सुद्धा याच प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले आहे. याबाबत बारामतीतील स्थानिक पत्रकारांनी विचारणा केली असता रूपाली चाकणकर म्हणाल्या,” बारामतीकरांनी मला निमंत्रित केलं होतं, म्हणून मी या प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी आले, बाकी मला माहित नाही”,
बारामती नगरपालिका आणि शासकीय अधिकारी यांनी मला निमंत्रण दिल्यामुळे मी प्रदर्शनाचे उद्घाटनासाठी आले आहे, मला उद्घाटनची वेळ सुद्धा दुपारी चारची दिली होती, मी वेळेवर आले आणि उद्घाटन केलं,मात्र माझ्यानंतर कोणी केव्हा आले आणि उद्घाटन कोणी कुणी केलं हे बाकी मला माहीत नाही, याबाबत तुम्ही प्रशासनाला विचारा असे सांगून बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा नाम उल्लेख त्यांनी टाळला.
दरम्यान ,बारामतीतल्या स्थानिक पत्रकारांनी सुप्रिया सुळे यांना विचारणा केली असता , खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मला बचत गटाच्या उद्घाटनासाठी दुपारी चारची वेळ देण्यात आली होती, याबाबतची माहिती कृपया आपण प्रशासनाला विचारावी,मी स्थानिक खासदार म्हणून मला दुपारी चारची वेळ देण्यात आली असल्यामुळे मी दुपारी चार वाजता उद्घाटनासाठी आले आहे,
याबाबतचे पत्रही प्रशासनाकडून मला देण्यात आले होते, पत्राचा मान राखून मी कार्यक्रमाला उपस्थित राहिले, जर या प्रदर्शनाचे उद्घाटन दोन वेळा झाले असेल तर मला ही प्रशासनाला याबाबत विचारणा करावीच लागणार आहे, असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
एकंदरीत बारामती दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाकडून कार्यक्रमाचे आयोजन केले जात असल्यामुळे श्रेया साठी लढाई चालू असल्याचे दिसून आले, अशी चर्चा बारामतीतल्या स्थानिक लोकांमध्ये चालू होती.