जिल्हा नियोजन समितीची (डीपीडीसी) बैठक सोमवारी (१७ ऑक्टोबर) होणार आहे. या बैठकीत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील महाविकास आघाडी सरकारच्या काळात ऐनवेळी मंजूर करण्यात आलेल्या कामांबाबत काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडी सरकार कोसळण्यापूर्वी घाईने मंजूर केलेल्या कामांत बदल होण्याची दाट शक्यता आहे.
हेही वाचा >>>पुणे : जिल्ह्यात ९३ जणांना नव्याने करोना संसर्ग
पालकमंत्री झाल्यानंतर पाटील यांनी गेल्या आठवड्यात जिल्हा परिषदेत बैठक घेऊन जिल्हा नियोजनच्या कामांचा आढावा घेतला. या बैठकीत ऐनवेळी मंजूर केलेल्या कामांची निधीनिहाय यादी पाटील यांनी मागवली होती. त्यानुसार जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी शनिवारी (१५ ऑक्टोबर) संबंधित सर्व अधिकाऱ्यांची पूर्वतयारीची बैठक बोलाविण्यात आली आहे. त्यामध्ये आणखी एकदा कामांचा आढावा घेऊन १७ ऑक्टोबरला दुपारी एक वाजता डीपीडीसी बैठक होणार आहे. या बैठकीची तयारी प्रशासनाकडून सुरू असून कामांच्या याद्या आणि प्रकल्पांचे सादरीकरण बैठकीत केले जाणार आहे.
हेही वाचा >>>पुणे : करोनाच्या ओमायक्रॉन विषाणूच्या नव्या प्रकारांच्या संक्रमणाचे संकट ; वर्धक मात्रेबाबत तज्ज्ञ डॉक्टर आग्रही
दरम्यान, तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनी चालू आर्थिक वर्षातील सुमारे ७२५ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला आहे. या आराखड्याला नवे सरकार येताच स्थगिती देण्यात आली होती. पालकमंत्री नियुक्तीनंतर ही स्थगिती उठविण्यात आली असून या आराखड्याचा फेरविचार करून कामांना मंजुरी देण्याचे धोरण हाती घेण्यात आले आहे. बैठकीपूर्वी पालकमंत्री पाटील यांनी पक्षीय पातळीवर बैठक घेऊन नवी कामे आणि त्यांच्या याद्या तयार करण्यास सांगितले आहे. त्यानुसार डीपीडीसीच्या कामांत फेरबदल होण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे.