पती-पत्नी दोघेही भारतीय.. पतीने दुबईत जाऊन स्वत:ची कंपनी सुरू केली आणि पत्नीला तिकडे बोलावले, पण काही वर्षांनंतर त्यांच्यात मतभेद झाले. त्यातून वादही सुरू झाले. त्या प्रकारांमुळे ती भारतात परतली.. परस्परांचे पटत नसल्यामुळे तिने पतीला इंटरनेटवरूनच संमतीने घटस्फोट घेण्याचा प्रस्ताव पाठवला.. पतीनेही तिचा प्रस्ताव मान्य करत घटस्फोटाची कागदपत्रे ई मेलवरून पाठविण्यास सांगितली. त्यानुसार सर्व अटी व कागदपत्रे पाठवून देण्यात आली.. ठरल्याप्रमाणे तो दुबईहून सकाळी पुण्यात आला.. दिवसभरात संमतीने घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झाली आणि संध्याकाळच्या विमानाने तो दुबईला परतला.
पुण्यातील सिंहगड रस्ता पसिरात राहणाऱ्या विमलचा राहुलशी (बदललेली नावे) तेरा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. विवाहानंतर राहुल नोकरीच्या निमित्ताने दुबईला गेला आणि पुढे त्याने तिकडेच स्वत:ची कंपनी सुरू केली. त्यानंतर त्याने पत्नीलाही तिकडे बोलवून घेतले. त्यांना आता सहा वर्षांचा मुलगा आहे. विमल दुबई येथे सहा ते सात वर्षे राहिली, मात्र एकमेकांचे विचार काही जुळत नव्हते. दैनंदिन जीवनातील छोटय़ा छोटय़ा गोष्टींवरून त्यांच्यात वाद सुरू झाले. त्यामुळे विमल मुलाला घेऊन पुण्यात आली. राहुलने पुण्यात एक घर घेऊन ठेवले होते. या घरात ती राहू लागली. मुलाचा आणि विमलचा सर्व खर्च राहुलच करत होता. दोघांमधील विसंवादाचा एकूण विचार करून अखेर तिने राहुलला ई मेलवरून संमतीने घटस्फोट घेऊ या असा प्रस्ताव दिला आणि राहुलनेही त्याला मान्यता दिली.
पतीच्या मान्यतेनंतर विमलने अ‍ॅड. सुप्रिया कोठारी यांच्यामार्फत संमतीने घटस्फोट मिळण्यासाठीची सर्व कागदपत्रे तयार केली. त्यानुसार पुण्यातील घर आणि मुलाच्या शिक्षणाचा खर्च असे एकूण दीड कोटी रुपये देण्याची मागणी तिने केली होती. संबंधित सर्व कागदपत्रे राहुलला दुबई येथे पाठवून देण्यात आली. त्याने त्यांचा अभ्यास करून प्रस्तावाला संमती दिली. संमतीने घटस्फोटाचा दिनांकही निश्चित करण्याबाबत त्याने तिला कळवले. त्यानुसार ठरलेल्या दिवशी सकाळी दुबईहून राहुल पुण्यात आला. दिवसभर घटस्फोटाची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तो संध्याकाळच्या विमानाने दुबईला परतला.
परदेशी राहणाऱ्यांचा भारतातच दावे दाखल करण्याकडे कल
विवाहानंतर नोकरीच्या निमित्ताने अनेक तरुण परदेशी जातात. परदेशात गेल्यानंतर बरेच दिवस ते भारतात फिरकतच नाहीत. तर काही घटनांमध्ये विवाहित युवक पत्नीला बरोबर घेऊन जातात. मात्र, त्या ठिकाणचे वातावरण, संस्कृती यांच्याशी मेळ न बसल्यामुळे पती-पत्नीमध्ये वाद सुरू होतात. काही प्रसंगी त्यांच्यातील वाद विकोपाला जातात. शेवटी घटस्फोट घेण्यासाठी न्यायालयीन लढाई सुरू होते. पती-पत्नी दोघेही परदेशात स्थायिक झालेले असले तरीही पती कधीही त्या देशात दावा दाखल करत नाहीत. त्यांचा भारतातील न्यायालयात दावा दाखल करण्याचा प्रयत्न असतो. भारतापेक्षा परदेशातील कायदे कडक असून प्रकरणांचा निकाल तत्काळ मिळतो. परदेशात काम करणाऱ्या व्यक्तींच्या संपत्तीची सर्व माहिती ऑनलाइन असते. घटस्फोटानंतर त्या देशातील कायद्यानुसार पतीच्या एकूण संपत्तीपैकी निम्मी संपती ही पत्नीला द्यावी लागते. त्यामुळे भारतातील तरुण हे विवाह केल्याचा भारतातील पुरावा देतात किंवा शेवटच्या भांडणाचे परिक्षेत्र भारतातील दाखवून भारतातील न्यायालयात दावा दाखल करतात. अशा दाव्यांचे प्रमाण अलीकडे वाढत चालले आहे.
अ‍ॅड. सुप्रिया कोठारी