पुणे : पतीला असलेले दारूचे व्यसन, कौटुंबिक वाद आणि पतीचे दुसऱ्या महिलेशी असलेले विवाहबाह्य संबंधांमुळे पत्नीने क्रुरतेच्या आधारावर दाखल केलेला घटस्फोटाचा दावा संमतीने निकाली काढण्यात आला. न्यायालयाच्या पुढाकाराने दावा समुपदेशनासाठी पाठविण्यात आल्यानंतर एका दिवसात निकाली काढण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कौटुंबिक न्यायालयातील न्यायाधीश एस. व्ही. फूलबांधे यांनी याबाबतचा निकाल दिला. या दाव्यातील पती अभियंता असून पत्नी गृहिणी आहे. नोकरी गेल्यानंतर पती काहीही काम करत नव्हता. त्यांच्यात कौटुंंबिक कारणातून सातत्याने वाद होत होते. पतीचे एका महिलेशी असलेल्या विवाहबाह्य संबंधाची पत्नीला कुणकुण लागली होती, असे दाव्यात नमूद करण्यात आले होते. पत्नीने क्रुरतेच्या आधारावर येथील कौटुंबिक न्यायालयात ॲड. अफरोजअली शेख आणि ॲड. इब्राहिम शेख यांच्यामार्फत दावा दाखल केला होता. त्यांना ॲड. प्रियांका कदम, ॲड. हर्षदा ताईवडे आणि ॲड. स्वालेहा शेख यांनी सहाय केले.

हेही वाचा – पुणे : कर्जमंजुरीच्या आमिषाने सायबर चोरट्यांचा दाम्पत्याला साडेनऊ लाखांचा गंडा

दाम्पत्याचा १२ मे २०१८ रोजी विवाह झाला होता. कौटुंबिक वादातून दोघेजण १० मार्च २०२२ पासून विभक्त राहत होते. दाव्याची नोटीस बजावल्यानंतर पती न्यायालयात हजर झाला. पती आणि पत्नीने संमतीने घटस्फोट घेण्याची तयारी दर्शविली. तसेच कोणत्याही अटी आणि शर्तीशिवाय घटस्फोट घेण्याचे दोघांनी मान्य केले. त्यांचा मुलगा कायमस्वरुपी पत्नीकडे राहणार असून त्यास पतीची काहीही हरकत नाही, असे ठरले. माझ्याकडे पैसे नसल्याने पोटगी देवू शकत नाही, असे पतीने स्पष्ट केले होते. वकिलांच्या सहभागाशिवाय आम्हीदेखील त्वरित निकाल देऊ शकत नाही. कारण पक्षकार हे वकिलांच्या सल्ल्याशिवाय तडजोड करण्यास तयार होत नाहीत, असे मत न्यायालयाने नोंदवले.

हेही वाचा – पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने व्यावसायिकाला ९९ लाखांचा गंडा

या प्रकरणातील दाम्पत्य एक वर्षांपेक्षा जास्त काळापासून विभक्त राहत होते. नोटीस मिळाल्यानंतर पती न्यायालयात हजर झाला. न्यायाधीशांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून तत्परतेने निकाल दिला. त्यामुळे पक्षकारांना न्यायालयात फेऱ्या माराव्या लागल्या नाहीत, असे दावा दाखल करणाऱ्या पत्नीचे वकील ॲड. अफरोजअली शेख आणि ॲड. इब्राहिम शेख यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Divorce suit filed by wife on ground of cruelty settled in one day pune print news rbk 25 ssb
Show comments