-कृष्णा पांचाळ
आपल्यासारखच इतर दिव्यांगांना हालअपेष्टांचा सामना करू लागू नये म्हणून एक ७० वर्षीय दिव्यांग व्यक्ती समोर येते. आपल्या भावाला मदतीला घेऊन त्यांनी दिव्यांगांसाठी शाळा सुरू केली. गेल्या तीस वर्षापासून त्यांचं हे ज्ञानकेंद्र अनेक दिव्यांगांना जगण्याचं बळ देत आहे. या शाळेत राज्यभरातून आलेले विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
विश्वनाथ वाघमोडे असं या आर्दशवाट निर्माण करणाऱ्या व्यक्तीच नाव आहे. दिव्यांगाच आयुष्य हे आनंदी आणि शिक्षणमय होण्याकरिता विश्वनाथ यांनी अतोनात प्रयत्न केले. पिंपरी-चिंचवडमध्ये त्यांनी एक शाळा उभारली असून, त्याला गेल्या तीस वर्षांपासून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. विश्वनाथ यांचा प्रवास लहान पणापासून खडतर राहिला. त्यांनी गरिबीचे चटके सोसले होते. अगदी दुःख आणि अपमान गिळत ते आज इथंपर्यंत पोहचले आहेत. मोठे बंधू हे देखील दिव्यांग होते, त्यानंतर विश्वनाथ यांचा जन्म झाला. मात्र त्यांनाही जन्मताच दिव्यांगाने ग्रासले होते. त्यामुळे त्यांच्या आईला हा धक्का सहन झाला नाही आणि विश्वनाथ हे पाच महिन्याचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले.
वडील आप्पासाहेब यांना देखील गावातील व्यक्ती दोन्ही मूल दिव्यांग असल्यावरून अपमानास्पद वागणूक देत. त्यामुळे विश्वनाथ यांनी लहानपणीच आपण आपल्या वडिलांचं नाव काढायचं असा चंग बांधला होता. मोठे बंधू आणि ते स्वतः दिव्यांग असल्याने पाहुणे देखील त्यांना जवळ करत नव्हते, अशी वाईट परिस्थती त्यांच्या लहानपणी येऊन ठेपली होती. अश्या परिस्थितीत वडिलांनी दोन्ही मुलांना चांगल्या प्रकारे शिक्षण दिले. विश्वनाथ यांचं अकरावी शिक्षण झाले आहे. गरिबी काय असू शकते याच उदाहरण देत ते म्हणाले, आमच्या सोबतची मुलं नवीन शर्ट घालत असत. पण आम्हाला ते मिळत नव्हते, एक शर्ट तब्बल एक वर्ष दिवसाआड धुवून घातल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत त्यांनी जीवन जगलेले आहे.
स्वतः ला एवढे कष्ट घ्यावे लागत असल्याने त्यांनी इतर दिव्यांग व्यक्तींचा विचार केला. गरिबांच्या मुलांना शिक्षण दिले पाहिजे असं ठरवलं. शाळेच्या माध्यमातून ते दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत. आतापर्यंत दीड हजार दिव्यांग विद्यार्थी हे शाळेतून शिक्षण घेऊन गेले आहेत. इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत शाळेत शिक्षण दिले जाते.
याविषयी बोलताना विश्वनाथ म्हणाले, “दिव्यांग असल्याने घाबरण्याची गरज नाही. निसर्गाने दिलेले हे रूप आहे. इच्छा शक्ती हवी यातून मार्ग निघतो,” असं विश्वनाथ यांनी दिव्यांग दिनाच्या निमित्ताने इतर दिव्यांग व्यक्तीला आवाहन केले आहे.